सोने पे सुहागा; लग्नाच्या सिझनमध्ये सोने स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

जर आपण लग्नाच्या या सीझनमध्ये सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे.

नवी दिल्ली : सोन्याची किंमतीत सातत्याने बदल होत आहेत. सोने आणि चांदीच्या दरामध्ये सतत उतार आणि चढ दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. जर आपण लग्नाच्या या सीझनमध्ये सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास 8,000 रुपयांपर्यंतची घट झालेली दिसून आली आहे. सराफ बाजारामध्ये पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये जोरदार घट पहायला मिळाली आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 534 रुपयांची घट झाली आहे. यानंतर आता सोने 48,652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. याआधी बुधवारी सोने 49,186 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. यासोबतच चांदीच्या किंमतीतही घट झालेली दिसून आली आहे. चांदी जवळपास 628 रुपयांनी घसरुन सध्या 62,711 रुपये प्रति किलो झाली आहे. बुधवारी चांदी 63,339 रुपये प्रति किलो होती. 

हेही वाचा - Stock Market Update : सेन्सेक्स-निफ्टीची दमदार ओपनिंग
कोरोना लशीच्या आगमनाची बातमी आणि त्याच्या वापराची बातमी आल्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि अमेरिका-चीनमधील तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदार सोने सोडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. यामुळेच येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्या कमी आहे. मात्र, अजूनही मोठ्या कालावधीसाठी सोने गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय मानला जातोय. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंचे भाव पडल्यामुळे देशात देखील सोने तसेच चांदीच्या किंमतींमध्ये घट होताना दिसत आहे. 7 ऑगस्ट 2020 ला सोने आणि चांदी दोन्हींच्याही किंमतीत आजवरची सर्वांत जास्त किंमत गाठली होती. 7 ऑगस्ट रोजी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होते तर चांदी 77,840 रुपये प्रति किलो होते. ही आजवरची सर्वांत जास्त किंमत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold price down in marriage festival good time to buy gold know the todays rate