
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दर वाढले होते. त्यानंतर पुन्हा सोनं स्वस्त झालं. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत.
नवी दिल्ली - यंदा वर्षभरात सोन्याच्या दरात मोठे चढ उतार झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर दरात सातत्यानं घसरण सुरू होती. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दर वाढले होते. त्यानंतर पुन्हा सोनं स्वस्त झालं. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोन्याच्या किंमतीत 107 रुपयांची वाढ होऊन प्रति दहा ग्रॅमचा दर 49 हजार 550 रुपये इतका झाला. तर चांदीच्या दरातही 324 रुपयांनी वाढ झाली. यामुळे चांदीचा दर 65 हजार 177 रुपये प्रति किलो एवढा झाला. काल सोन्याचा दर 49 हजार 443 रुपये होता तर आज सकाळी 49 हजार 566 रुपयांनी ओपनिंग झाले.
हे वाचा - पुढील 15 दिवसांत पेट्रोल दरवाढीची झळ होणार कमी
दिल्लीतील सराफ बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. जागतिक स्तरावर झालेली वाढ आणि रुपयाची घसरण यामुळे सोनं 514 रुपयांनी महाग झालं. यामुळे सोन्याचा दर 48 हजार 847 रुपयांवर पोहोचला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चांदीच्या किंमतीसुद्धा 1046 रुपयांनी वाढल्या. यामुळे दर 63 हजार 612 रुपये इतका झाला होता.
हे वाचा - लॉकडाउनमुळे वाहनउद्योग पंक्चर; ३ लाख ४५ हजार लोकांचा रोजगार गेला
सोन्याने यंदा तब्बल 57 हजार 100 रुपये इतका विक्रमी उच्चांक गाठला होता. सध्याचा दर पाहता सोनं 7 हजार रुपयांहून अधिक स्वस्त झालं आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा 0.26 टक्क्यांनी वाढल्यानं किंमत 49 हजार 571 रुपयांवर पोहोचली. तर चांदीमध्ये 0.6 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर दर 65 हजार 230 रुपये प्रतिकिलो इतका झाला.