सोन्याची झळाळी उतरली 

पीटीआय
Monday, 13 January 2020

जागतिक पातळीवर भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची झळाळी सोमवारी कमी झाली. दिल्लीत सोन्याचा भाव 236 रुपयांनी, तर चांदीचा भाव 376 रुपयांनी कमी झाला. 

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिकेतील संघर्ष काही प्रमाणात निवळला असून, यामुळे भू-राजकीय तणाव वाढण्याची शक्‍यताही कमी झाली आहे. आता जागतिक बाजारपेठेचे लक्ष अमेरिका-चीन व्यापार कराराकडे लागले आहे. यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांकडून सोने विक्रीचा मारा सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 550 डॉलरवर आला, तर चांदीचा भाव प्रतिऔंसला 17.97 डॉलरवर आला. 

जागतिक पातळीवरील विक्रीचा दबाव आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे दिल्लीत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. येथील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहाग्रॅमला 236 रुपयांची घसरण होऊन 40 हजार 432 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 376 रुपयांची घट होऊन 47 हजार 635 रुपयांवर आला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी दिली. 

मुंबईमध्ये भावात किरकोळ घसरण 
मुंबईतील सराफा बाजारातही आज सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली, तर चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिदहाग्रॅमला तीन रुपयांची घसरण होऊन 39 हजार 757 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 85 रुपयांनी वधारून 46 हजार 265 रुपयांवर बंद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices decline Rs 236 on global selling