सोन्याची चकाकी परतणार ?

वृत्तसंस्था
Saturday, 6 June 2020

या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 13 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण या आठवड्यात झाली आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या आकडेवारीचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे. 75 लाख रोजगार गमावले जाण्याची अपेक्षा असताना 25 लाख रोजगारांची वाढ झाल्याच्या वृत्तामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत.

सोन्याच्या भावात शुक्रवारी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा उभारणी घेण्याची आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाल्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे. अमेरिकेतील रोजगार आणि वेतनासंबंधीच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या माहितीमुळे गुंतवणूकदारांचा ओढा इक्विटीकडे वळला आहे. त्यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील मागणीत घट नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घटकांचा विशेषत: अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराष्ट्रीय बाजारात  सोन्याच्या भावात शुक्रवारी 2 टक्क्यांची घट होत ते 1,675.70 डॉलर प्रति औंसवर आले होते. तर अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्ये 2.8 टक्क्यांची घट होत ते 1,678.40 डॉलरवर आले होते. एमसीएक्सवर सोन्याच्या भावात 998 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट होत ते 45,698 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत.
बुलियन बाजारात सोन्याचा भाव घटून 46,696 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 13 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण या आठवड्यात झाली आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या आकडेवारीचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला आहे. 75 लाख रोजगार गमावले जाण्याची अपेक्षा असताना 25 लाख रोजगारांची वाढ झाल्याच्या वृत्तामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​

याचा परिणाम सोन्याच्या भावावरील दबाव वाढून त्यात घट होण्यात झाला आहे. डॉलरचे मूल्यसुद्धा थोडेसे वधारले आहे. अमेरिकेतील ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात 14.7 टक्के असणारा बेरोजगारी दर सुधारणा होत मे महिन्यात 13.3 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातदेखील या आठवड्यात सुधारणा झाली आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची पतधोरणासंदर्भात दोन दिवसीय बैठक होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या शिखर बँकेने मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात इतर मौल्यवान धातूंमध्ये पॅलाडियमच्या भावात 0.2 टक्क्यांची वाढ होत ते 1,937.20 डॉलर प्रति औंसवर पोचले आहे. तर प्लॅटिनमचे भाव 3.6 टक्क्यांनी घटून 806.45 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
चांदीच्या भावातदेखील 2.4 टक्क्यांची घट होत ते 17.29 प्रति औंसवर आले आहेत. देशातील बुलियन बाजारात चांदीचा भाव 1460 रुपयांनी घटून  47,351 रुपये प्रति किलोवर आला आहे.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

सरलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातदेखील सकारात्मक परिणाम दिसत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 34,000 अंशांच्या आणि निफ्टी 10,000 अंशांच्या पातळीवर स्थिरावला आहे. शेअर बाजारात तेजी परतल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावात घट होण्यात झाला आहे.

असे जरी असले तरी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आगामी काळातदेखील अशीच राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अमेरिका-चीन व्यापार तणाव, अमेरिकेतील जनतेमधील असंतोष याचा दीर्घकालात सोन्यावर नकारात्मक परिणाम होण्यापेक्षा सकारात्मक परिणाम होत सोन्याच्या भावात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices declined this week, but may increase in future