Gold prices: मागील 3 दिवसांत सोने दुसऱ्यांदा उतरले; जाणून घ्या आजची किंमत

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

जागतिक बाजारपेठेतही आज सोन्याचे भाव घसरले. स्थिर राहिलेल्या अमेरिकी डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला.

नवी दिल्ली: आज भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव कमी झाले आहेत. एमसीएक्सवर डिसेंबर गोल्ड फ्युचर्सचे सोने 0.4 टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅमला 50 हजार 360 रुपये झाले. महत्वाचे म्हणजे मौल्यवान धातूंच्या किंमती तीन दिवसांत दुसऱ्यांदा घसरताना दिसल्या आहेत. दुसरीकडे डिसेंबरचे चांदीचे वायदे 0.9 टक्क्यांनी घसरून 61 हजार 64 रुपये प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात सोने 0.5 टक्क्यांनी, तर चांदी 1.6 टक्क्यांनी वाढली होती. 

जागतिक बाजारपेठेतील किंमत-
जागतिक बाजारपेठेतही आज सोन्याचे भाव घसरले. स्थिर राहिलेल्या अमेरिकी डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1893.17 डॉलर प्रति औंस झाले. तर चांदी एक टक्क्याने घसरून 24.05 डॉलर प्रति औंस झाली आहे.

Positive News: इंजिनीअर्सना अच्छे दिन; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमध्ये भरपूर संधी

डॉलर निर्देशांक 93.435 च्या पातळीवर पोहोचला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे डॉलर वधारला असून अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजच्या अनिश्चिततेचा डॉलरच्या किंमतीवरही परिणाम होत आहे. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्टीव्हन मेनुचिन यांनी सांगितले की, पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आर्थिक प्रोत्साहन देणे अवघड आहे, तसेच त्याचा भारही इतर इक्विटीवर आहे.

अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजबद्दल जोपर्यंत अधिक स्पष्टता येत नाही तोपर्यंत सोन्याच्या किंमतीत घट होऊ शकते, असे मत कोटक सिक्युरिटीजने व्यक्त केले आहे. तसेच मौल्यवान धातूसोबत सोन्यात गुंतवणूक करणारे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे लक्ष लाऊन आहेत. सध्या डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन शर्यतीत आघाडीवर आहेत, त्याचाही आतंरराष्ट्रीय कमॉडीटी मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो

सासू सुनेचे प्रेम ठरले लव जिहादचे कारण; तनिष्कच्या  ''त्या'' जाहिरातीवर बंदी

सध्या युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याची दिसत आहे. फ्रान्सने प्रमुख शहरांमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचबरोबर जर्मनीनेही कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices decreased today in Indian and international market