आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला तेजीची झळाळी

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने सोमवारी २ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उसळी घेत मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने सोमवारी २ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उसळी घेत मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ६८२ डॉलरवर पोचला आहे. याचबरोबर चांदीचा भाव प्रतिऔंस १८.८० डॉलरवर गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनबाहेर अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा परिणाम असाच सुरू राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रतिऔंस १ हजार ७०० डॉलरची पोचण्याची शक्यता आहे. 

जागतिक पातळीवरील तेजीचा परिणाम आज देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून आला. याचबरोबर देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया, यामुळे सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅममागे ९५३ रुपयांची उसळी घेऊन ४४ हजार ४७२ रुपयांवर पोचला. चांदीच्या भावातही किलोमागे ५८६ रुपयांची वाढ होऊन तो ४९ हजार ९९० रुपयांवर गेला. 

मुंबईत भावात १ हजार ८४८ रुपयांची उसळी
मुंबईतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याच्या भावाने प्रतिदहा ग्रॅममागे १ हजार ८४८ रुपयांची उसळी घेऊन तो ४३ हजार ५९० रुपयांवर पोचला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही १ हजार ८४० रुपयांची वाढ होऊन ४३ हजार ४१५ रुपयांवर गेला. चांदीचा भावही प्रतिकिलोमागे १ हजार ४३० रुपयांनी वधारून ४९ हजार ३५ रुपयांवर गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices high