सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

 सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली.

भावाने गाठली ऐतिहासिक उच्चांकी पातळी 
नवी दिल्ली:  सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. येथील सराफा बाजारात सोन्याचा भाव आज प्रति दहा ग्रॅम 36 हजार 970 रुपयांवर गेला. चांदीच्या भावात आज प्रति किलोमागे एक हजार रुपयांची वाढ होऊन तो 43 हजार 100 रुपयांवर गेला. 
अमेरिका -चीन व्यापारयुद्धाचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढल्याने भावात आज वाढ झाली. अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव वाढल्यामुळे सोन्याचा भाव आज मे 2013 नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोचला. स्थानिक सराफांकडूनही सोन्याला मागणी वाढल्याचाही परिणाम भावावर झाला. 

अमेरिकेने चीनच्या 300 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आकारले आहे. हे शुल्क 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या खरेदीवर भर दिला जात आहे. यामुळे सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेतर रुपयात झालेली मोठी घसरणही भाववाढीस कारणीभूत ठरली. 

सोन्याचा भाव (नवी दिल्ली) 
प्रति दहा ग्रॅम ः 36,970 

चांदीचा भाव 
एक किलो ः 43,100


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices surge today to record highs, silver rates zoom