सोन्याचा भाव चढाच राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

पुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने गुंतवणूकदारांना गेल्या दशकभरात चांगला परतावा दिला आहे. २००८ मध्ये सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव १२ हजार रुपये होता आणि आता तो ३१ हजार रुपयांजवळ आहे. गेल्या दहा वर्षांत सोन्यात गुंतवणूक केलेल्यांना मुद्दलाव्यतिरिक्त १८० टक्के नफा मिळाला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही यापुढील काळातही महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या देशातील सोन्याचा भाव हा प्रामुख्याने जागतिक बाजारातील भाव, तसेच डॉलर व रुपया यांचे विनिमय मूल्य यांवर अवलंबून आहे.’’ 

जागतिक पातळीवर सध्या सोन्याचा प्रति औंस (३१.१४ ग्रॅम) भाव १२२० डॉलर आहे. प्रत्यक्षात जागतिक पातळीवर सोन्याचे भाव जास्त वाढलेले नाहीत. तसेच पाश्‍चिमात्य देशांमध्ये व्याजदर वाढत असल्याने सोन्याच्या भावात जागतिक पातळीवर डॉलरच्या परिमाणात वाढ दिसण्याची शक्‍यता कमी आहे. पण भारतात सोन्याच्या भावावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक डॉलर-रुपया यांचे विनिमय मूल्य आहे. नजीकच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्य सुधारण्याची शक्‍यता कमी आहे.

भारतीय रुपयाचे मूल्य सध्या डॉलरच्या तुलनेत ७३ रुपयांच्या पातळीवर आहे. पण डॉलरच्या तुलनेत रुपया ७५च्या पातळीवर गेल्यास सोने प्रति दहा ग्रॅमला ३३,५०० रुपयांची पातळी गाठू शकते.
- अमित मोडक, कमोडिटी तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Rate Increase