महिन्याभरात सोन्याची झळाळी उतरली; वाचा आजचे दर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

 जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि युरोपिय देशांमध्ये आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आला आहे. शुक्रवारी कॉमेक्सवर सोन्याच्या किंमतीत 1 टक्क्याहून जास्त घसरण झाली. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दर घसरल्यानंतर सोन्याची किंमत 1941 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे. यावर जगभरातील मोठ्या रेटिंग संस्थांनी असं मत व्यक्त केलं की, पुढच्या वर्षी सुरुवातीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. 

सिटी ग्रुपच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात सोन्याच्या दरात 30 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसंच दर घसरले तर ते 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात असाही अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच जर दर वाढले तर सोन्याच्या किंमती 2275 डॉलर प्रति औंस इतके होऊ शकतात. तर घसरण झाल्यास 1600 डॉलर प्रति औंस इतका दर होऊ शकेल असं अहवालात म्हटलं आहे. 

हे वाचा - भारतासमोरील आर्थिक संकट आणखी काही काळ कायम

गेल्या महिन्याभरात सोन्याच्या वाढलेल्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचे मुख्य कारण रुपयाची वधारलेली किंमत सांगितलं जात आहे. 10 ऑगस्टला सोन्याचा दर 65 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तो आता सराफ बाजारात 52 हजार प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. महिन्याभरात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सलग चार दिवस सोन्याचे दर वाढले होते. मात्र शुक्रवारी पुन्हा दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. दहा ग्रॅम सोन्याचे दर 52 हजार 643 रुपयांवरून 52 हजार 452 रुपयांवर आली आहे. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 191 रुपयांनी कमी झाले.

चांदीचे दरही झाले कमी 
सोन्याशिवाय चांदीच्या दरातही गेल्या महिन्याभरात घट बघायला मिळाली. शुक्रवारी दिल्लीत एक किलो चांदीचे दर 990 रुपयांनी कमी झाले. गुरुवारी एक किलोग्रॅम चांदीचे दर 70 हजार 431 रुपये इतके होते. ते शुक्रवारी 69 हजार 950 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate today 12 September silver price