सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; चांदीच्या भावातही किरकोळ वाढ

टीम ई सकाळ
Tuesday, 29 December 2020

आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं दरात वाढ होत असल्याचं दिसत आहे. 

नवी दिल्ली - आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं दरात वाढ होत असल्याचं दिसत आहे. याचा परिणाम घरेलू बाजारावरही होत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने मंगळवारी दिल्लीतील सराफ बाजारातील सोने चांदीच्या दराबाबत माहिती दिली आहे. 

सोमवारी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याचा दर 39 रुपयांनी वाढला. यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 49 हजार 610 रुपये इतका झाला. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहेत. याआधी सोन्याचा दर 49 हजार 571 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर 1883 डॉलर प्रति औंस होता. 

हे वाचा - फायद्या-तोट्याचं गणित बिघडणार; जाणून घ्या नव्या वर्षातील नवे नियम

सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीतही किरकोळ दरवाढ झाली आहे. चांदी मंगळवारी फक्त 36 रुपयांनी महागली असून एक किलो चांदीचा दर 68 हजार 156 रुपये इतका झाला. त्याआधी चांदीचा दर 68 हजार 120 रुपये प्रतिकिलो इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 26.26 डॉलर प्रति औंस होती. 

हे वाचा - जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या

किंमतीमध्ये झालेल्या किरकोळ वाढीबाबत तज्ज्ञांनी असं मत नोंदवलं की, आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 11 पैशांनी वधारली. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आतापर्यंत सोन्याच्या दरात 6 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याचे दर 28 टक्क्यांनी वाढले आहेत. पुढच्या वर्षीही सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate today 29 dec gold silver rates price tuesday