सोने लवकरच 47 हजारांवर ?, तज्ञांचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने लवकरच 47 हजारांवर ?, तज्ञांचा अंदाज

मुंबई : सोन्याच्या दरात सध्या अनेक कारणांमुळे घसरण होत असली तरी ती तात्पुरती असून लवकरच सोन्याचे दर तोळ्यामागे 47 हजारांपर्यंत जातील, असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार तसेच व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. (gold rates up will soon 47 thousand)

काही महिन्यांपूर्वी 55 हजार रुपये प्रती तोळा एवढे सोन्याचे उच्चांकी दर होते, त्यानंतर ते घसरून 43 ते 44 हजारांपर्यंत पडल्यावर सध्या 45 ते 46 हजारांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात जूनच्या मध्यापासून ते आतापर्यंत सोन्याचे दर जवळपास अडीच टक्क्यांनी घटले आहेत. तर किलोमागे 73 हजारांवर गेलेली चांदीही आता 63 हजारांवर स्थिरावली आहे.

अमेरिकी डॉलर सध्या मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमधील सोन्याची किंमत कमी झाली आहे. त्याचमुळे आपल्याकडेही सोन्याचे दर घसरले आहेत, पण दिवाळीपर्यंत सोन्यात पुन्हा दरवाढ होईल, असे गोल्ड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी सकाळ ला सांगितले. चांदीचे दरही सोन्याप्रमाणेच वरखाली होत असतात. अर्थात चांदीचा वापर औद्योगिक कारणांसाठीदेखील होत असल्याने सोने-चांदी यांच्या वध-घटीत थोडा फरक असतोच. पण तरीही भविष्यात चांदीच्या दरातही वाढ होईलच, असेही पेठे यांनी सांगितले.

अनेक देशांमध्ये कोविड किंवा डेल्टा विषाणूचे वाढणारे रोगी, त्यामुळे विकासाबाबतची अनिश्चितता, अमेरिकेतील बाँडचे घटते उत्पन्न, कमी होणारी बेकारी व त्यामुळे कोरोना काळातील पॅकेज मागे घेण्याची अमेरिकन फेड ची धोरणे आदी कारणे सोन्याच्या दरातील घसरणीमागे होती. त्यामुळे जागतिक वायदे बाजारांमध्येही मोठ्या गुंतवणुकदारांनी सोन्याची विक्री केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे दर कमी होत असून हाच कल येते काही आठवडेही कायम राहील, असे अँजल ब्रोकिंग लि. चे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

तरीही सोन्यासारखा मौल्यवान धातू प्रत्येक पडझडीच्या वेळी थोडा थोडा खरेदी करायलाच हवा. यापूर्वीच्या सोन्याच्या तेजीत अनेक गुंतवणुकदारांची सोन्यात नफा कमावण्याची संधी हुकली. त्यांच्यासाठी तर आता सध्याची सोन्याच्या दरातील पडझड ही सुवर्णसंधी आहे 45,000 रु. ते 46,000 रु. या पट्ट्यात सोन्याची खरेदी करावी. काही महिन्यांत सोन्याचे दर 47 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असेही मल्ल्या म्हणाले.

टॅग्स :gold