सोने, चांदीची झळाळी सणासुदीतही कमी

पीटीआय
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली.

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यास प्राधान्य देऊन शेअर बाजाराकडे मोर्चा वळविला. यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. दिल्लीतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 215 रुपयांची घसरण होऊन 38 हजार 676 रुपयांवर आला. याचवेळी चांदीचा भावही प्रतिकिलोमागे 770 रुपयांची घट होऊन 47 हजार 690 रुपयांवर बंद झाला. कालही सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती.

जागतिक पातळीवरही घसरण
अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'कडून व्याजदराबाबत काय निर्णय होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे जागतिक पातळीवर आज सोने, चांदीच्या भावात घसरण नोंदविण्यात आली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 500 डॉलरवर आला, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.81 डॉलरवर आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Silver Rate Less in Festival