तेजी-मंदीचा हेलकावा

गोपाळ गलगली
Monday, 4 January 2021

शेअर बाजार वाढताना मंद गतीने वाढत असतो. शेवटी शेवटी गती वाढते आणि मंदीची लक्षणे दिसू लागतात. परंतु, मंदी येईलच, असे नाही. बाजार स्थिर किंवा परत तेजी पकडू शकतो. चंचलता हा बाजाराचा स्वभाव आहे.

शेअर बाजाराला मोजणारी फूटपट्टी ‘सेन्सेक्स’वर लवकरच हिमालयाच्या दुप्पट उंचीएवढा अंक दिसू लागण्याची शक्यता आहे. मात्र, याचवेळी स्वारी त्याच्या स्वधर्मानुसार तेवढ्याच वेगाने माघारी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

काही लक्षणावरून बाजाराची चाल थोड्या प्रमाणात ओळखता येऊ शकते. तेजी, मंदी ही इंग्रजी ‘यू’, ‘व्ही’ किंवा ‘डब्ल्यू’ या आकारात असते. हल्ली तेजी ‘व्ही’ आकारात चालू आहे. तेजी, मंदी ओसरण्याची चिन्हे कोणती, हे जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेजी सरण्याची चिन्हे

 • बाजाराचा ‘पीई रेशो’ बराच वाढलेला असतो.
 • शेअरच्या पुस्तकी आणि बाजारी किमतीत बरीच तफावत निर्माण झालेली असते.
 • बाजारात एकामागून एक मोठमोठे ‘आयपीओ’ प्रवेश करीत असतात. किमतीदेखील चढ्या असतात.
 • शेअर व्यवहाराने कळस गाठलेला असतो.
 • ‘सेन्सेक्स’ वा ‘निफ्टी’ तुफान वाढत असतात.
 • शेअरचे भाव ५२ आठवड्यांचे किंवा आजपर्यंतचे उच्चांक मोडत असतात.
 • लाभांशाचा परतावा कमी झालेला असतो.
 • रोकड-पैशाची चणचण निर्माण झालेली असते.
 • परताव्याच्या दृष्टीने नागरिक ठेवी किंवा म्युच्युअल फंडातून बाहेर पडून शेअरमध्ये पैसे गुंतवत असतात.
 • कंपनीच्या चांगल्या बातमीने देखील बाजार खाली येऊ लागतो.
 • सोन्याचा बाजार खाली गेलेला असतो.
 • बँका ‘मार्जिन मनी’ वाढवीत असतात.
 • छोट्या-छोट्या शेअरचा प्रादुर्भाव वाढत असतो.

शेअर बाजार वाढताना मंद गतीने वाढत असतो. शेवटी शेवटी गती वाढते आणि मंदीची लक्षणे दिसू लागतात. परंतु, मंदी येईलच, असे नाही. बाजार स्थिर किंवा परत तेजी पकडू शकतो. चंचलता हा बाजाराचा स्वभाव आहे.

ऐका हो ऐका! नवीन व्यवसाय सुरू करायचाय पण लोन घेण्याबाबत संभ्रमात आहात? मग ही बातमी नक्की वाचा

मंदी ओसरण्याची चिन्हे
जशी तेजीची जागा मंदी घेऊ लागते, तशी रोकडीचे महत्त्व वाढत जाते. बाजार घसरेल म्हणून नागरिक शेअर तोट्यात विकू लागतात. एका शेअरमधून दुसऱ्या शेअरमध्ये जातात. मंदीने तळ गाठलेला असताना तेजीची चाहूल लागू लागते.

 • बाजाराचा आणि महत्त्वाच्या शेअरचा सरासरी ‘पीई रेशो’ बराच खाली आलेला असतो.
 • रोकडीला बरेच महत्त्व आलेले असते.
 • शेअरचे बाजारभाव पुस्तकी किमतीच्या आसपास आलेले असतात.
 • लाभांशाची वेळ असल्यास त्याचा परतावा वाढलेला असतो.
 • नवीन ‘आ़यपीओ’ येत नसतात.
 • शेअरचे व्यवहार कमी-कमी होतात.
 • सोन्याचा बाजार सुधारू लागतो.
 • बँका शेअरवर कर्ज देणे कमी करतात.
 • चांगल्या कंपन्यांचे भाव बरेच खाली आलेले असतात.

सर्वसाधारण तेजी जास्त काळ टिकते आणि मंदी कमी वेळ. कारण बहुतेकांना तेजी आवडत असते. गुंतवणूकदार आपली प्यादी पुढे-मागे सरकवत असतात. काहींचा खिसा भरत असतो, बऱ्याच जणांचा मात्र रिकामा होत असतो. मात्र, ब्रोकर मंडळीचे मीटर चालू असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gopal galgali write article sharemarket Ups and downs