GST ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST collection

GST ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी उत्पन्न

नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन झाले असून, आतापर्यंतचे हे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये १.६८ लाख कोटी रुपयांचे विक्रमी संकलन झाले होते. सणासुदीच्या काळात झालेल्या खरेदीतील वाढीमुळे जीएसटी महसुलातही वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या १.३० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनात १६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये १.४२ लाख कोटी रुपये संकलन झाले होते. सलग आठ महिन्यांत १.४० लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी संकलन झाले आहे. तर दोन महिन्यांमध्ये त्याने १.५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात

महाराष्ट्र जीएसटी संकलनात पहिल्या पाच राज्यात आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये जीएसटी संकलनात सर्वात वरच्या पाच राज्यांत महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील जीएसटी संकलन मागील वर्षीच्या तुलनेत १९ टक्के वाढले. यावर्षी २३,०३७ कोटी इतके जीएसटी संकलन महाराष्ट्रातून झाले. जीएसटीमध्ये ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांचे चार स्लॅब आहेत. अर्थात सोने आणि सोन्याच्या दागिन्यांवर ३ टक्के कर लागतो. काही अनब्रँडेड आणि अनपॅक्ट उत्पादनावर जीएसटी लागू होत नाही. ‘ऑक्टोबर हा सण आणि सुट्ट्यांचा महिना होता. ज्यामध्ये लोक घरे, वाहने, पर्यटन आणि इतर गोष्टींवर भरपूर खर्च करतात. त्यामुळे आता नोव्हेंबरपासून मासिक जीएसटी संकलन निश्चितपणे १.५० लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल,’

असा विश्वास एन. ए. शाह असोसिएट्सचे भागीदार पराग मेहता यांनी व्यक्त केला. तर प्रमुख राज्यांनीही करसंकलनात भरघोस वाढ नोंदवल्याचे डेलॉइट इंडियाचे भागीदार एम.एस.मणी यांनी म्हटले आहे.

जीएसटीतील वर्गीकरण

  • एकूण जीएसटी संकलन ः १,५१, ७१८ कोटी रुपये

  • केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) ः २६,०३९ कोटी रुपये,

  • राज्य जीएसटी (एससीजीएसटी) ः ३३,३९६ कोटी रुपये,

  • एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) ः ८१,७७८ कोटी रुपये

  • सेस ः १०,५०५ कोटी रुपये

सणासुदीच्या हंगामामुळे सप्टेंबर महिन्यात ई-वे बिलांनी ऑगस्टमधील ७.७ कोटींचा उच्चांकी टप्पा ओलांडत ८.३ कोटींचा टप्पा गाठल्याने ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्येही ई-वे बिलांमधील वाढीने नोव्हेंबर मधील करसंकलनाला चालना मिळेल.अर्थंसकल्पीय अंदाजापेक्षा सीजीएसटी १.३ ते १.४ लाख कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

- अदिती नायर, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, इक्रा