कोरोना संकटात केंद्र सरकारला मोठा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

कोरोना संकटात केंद्र सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उडालेला आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा हा देशभरात चिंतेचा विषय ठरला असताना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या म्हणजे एप्रिल महिन्यात बाजारातील उलाढाल वाढल्याने जीएसटीपोटी (वस्तू आणि सेवा कर) १.४१ लाख कोटींची विक्रमी महसुलाची प्राप्ती सरकारला झाली आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र सकारला एप्रिलमध्ये जीएसटीपोटी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम म्हणजे १,४१,३८४ कोटी रुपये मिळाले.

मार्चमधील जीएसटी वसुलीच्या तुलनेत ही रक्कम १४ टक्क्यांनी जास्त आहे. यात केंद्रीय जीएसटी २७८३७ कोटी, राज्य जीएसटी ३५६२१ कोटी, आंतरराज्यीय वस्तू, सेवा पुरवठ्यावरील आयजीएसटी ६८४८१ कोटी रुपये, तसेच ९४४५ कोटी रुपयांचा अधिभार अशी मिळकत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशाच्या बऱ्याच राज्यांमध्ये कठोर निर्बंध असले तरी अर्थव्यवस्थेतील सुधारणा यातून दिसते, असे सरकारचे म्हणणे आहे.

कोरोना संकटाबरोबरच आर्थिक अडचणीमुळे जीएसटीच्या भरपाईसाठी राज्यांची मागणी सुरू झाली. डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी वसुलीने १,१५,१७४ कोटी रुपये असा लाखाचा आकडा ओलांडल्यामुळे केंद्र सरकारला हायसे वाटले होते. त्यानंतर जीएसटी वसुलीत सातत्याने सुधारणा होत गेली आहे. २०२१च्या जानेवारीमध्ये १,१९८७५ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये १,१३,१४३ कोटी रुपये तर मार्चमध्ये १२३९०२ कोटी रुपये मिळाले होते. मार्चमध्ये महाराष्ट्रातून १७,०३८.४९ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती.

टॅग्स :Narendra ModiGST