Harley Davidson ची नवी इलेक्ट्रिक बाईक भारतात; किंमत फक्त...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 August 2019

हार्ले डेव्हिडसनने भारतीय बाजारपेठेत आपली नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल 'लाईव्हवायर' आणली आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकलबरोबरच हार्ले डेव्हिडसनने आणखी एक लिमिटेड एडिशन मोटरसायकल भारतात उपलब्ध केली आहे.

नवी दिल्ली : हार्ले डेव्हिडसनने भारतीय बाजारपेठेत आपली नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल 'लाईव्हवायर' आणली आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकलबरोबरच हार्ले डेव्हिडसनने आणखी एक लिमिटेड एडिशन मोटरसायकल भारतात आणली आहे. स्ट्रीट 750 असे मोटरसायकलचे नाव आहे. स्पेशल एडिशन स्ट्रीट 750 ची भारतातील किंमत 5.47 लाख रुपये असणार आहे. या मॉडेलच्या फक्त 300 मोटरसायकलच बाजारात आणण्यात येणार आहेत.

इलेक्ट्रिक मोटरसायकल लाईव्हवायरमध्ये पर्मनंट मॅग्नेट इलेक्ट्रिक रिव्हेलेशन मोटर देण्यात आली आहे. ही मोटर हार्ले डेव्हिडसनची आतापर्यतची सर्वाधिक शक्तिशाली मोटर आहे. ही मोटर 103.5 बीएचपी आणि 116 एनएमचा टॉर्क तयार करते. लाईव्हवायर हे मॉडेल कास्ट अॅल्युमिनियम फ्रेमवर बनवण्यात आले आहे. नव्या लाईव्हवायरमध्ये लिथियम आयन सेल असलेली रिचार्जेबल एनर्जी स्टोरेज सिस्टम देण्यात आली आहे. ही मोटरसायकल 40 मिनिटात 80 टक्के आणि एका तासात पूर्णपणे चार्ज होते.

याशिवाय यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हार्ले डेव्हिडसनने यात अनेक अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत. लाईव्हवायर हे मॉडेल लाईम ग्रीन, ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harley Davidson unveils two bikes in India one BS VI compliant one electric