अबब! एचडीएफसी बँकेच्या एमडींचे वेतन तब्बल 56 कोटी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 June 2019

- देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बॅंकेच्या एमडींचे वेतन आहे 55.87 कोटी इतके.

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आदित्य पुरी यांचे 2018-19 या आर्थिक वर्षातील वार्षिक वेतन 55.87 कोटी रुपये इतके होते. पुरी यांनी वर्षभरात वेतन, भत्ते आणि शेअरच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांमध्ये त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 36 टक्के वाढ झाली आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात पुरी यांचे वार्षिक वेतन 41.06 कोटी रुपये होते. बॅंकेच्या वार्षिक अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. आदित्य पुरी यांना 10.73 कोटी रुपये फिक्स्ड वेतन म्हणून तर 2.26 कोटी रुपये भत्ते, 0.67 कोटी रुपये पीएफ पोटी देण्यात आले आहेत. तर एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन म्हणजेच वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बॅंकेच्या शेअरद्वारे 42.20 कोटी रुपये (इतक्या मूल्याचे शेअर) मिळाले आहेत. या सर्वांची बेरिज करता पुरी यांनी एकत्रितरित्या 55.87 कोटी रुपये मागील वर्षभरात मिळाले आहेत.

तर बँकेचे उप-व्यवस्थापकीय संचालक परेश सुकथनकर यांनी सरलेल्या आर्थिक वर्षात वेतनापोटी 6.33 कोटी रुपये कमावले आहेत. यात कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेअरचे मूल्य समाविष्ट केलेले नाही. 2018-19 या आर्थिक वर्षात एचडीएफसी बॅंकेचा नफा 20.5 टक्क्यांनी वाढून 21,078.14 कोटी रुपयांवर पोचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Bank MDs salary is 56 crores