एचडीएफसी म्युच्युअल फंडांने थांबवली लॉँग टर्म अॅडव्हान्टेज फंडातील गुंतवणूक

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

एचडीएफसी म्युच्युअल फंडांने लॉँग टर्म अॅडव्हान्टेज फंडात होणारी गुंतवणूक 16 मे पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : एचडीएफसी म्युच्युअल फंडांने लॉँग टर्म अॅडव्हान्टेज फंडात होणारी गुंतवणूक 16 मे पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक इएलसीसी (इक्विटी लिंक्ड सेविंग स्किम) किंवा टॅक्स सेविंग या प्रकारातला म्युच्युअल फंड आहे. या स्किममध्ये आतापर्यंत 1,515 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने हा निर्णय घेण्यामागे सेबीचे अलिकडच्या काळात वेगवेगळ्या प्रकारांची पुनर्रचना करण्यासंदर्भातले धोरणाची पार्श्वभूमी आहे. 
सेबीच्या नव्या नियमांप्रमाणे कुठल्याही फंड हाऊसला कोणत्याही म्युच्युअल फंड प्रकारात प्रत्येकी फक्त एकच योजना ठेवता येणार आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या दोन इएलएसएस स्किम्स सध्या बाजारात आहेत.त्यामुळे एचडीएफसीने यातील  टॅक्स सेव्हर फंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी एक माहिती पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या अंतिम तारखेनंतर या फंडात एसआयपी, एसटीपी आणि इतर प्रकारांनी केली जाणारी गुंतवणूक स्विकारली जाणार नाही.अनेक म्युच्युअल फंड सल्लागारांच्या मते, या योजनेत गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक अडकवून ठेऊ नये. बऱ्याचशा गुंतवणूकदारांना हे अडचणीचे  वाटू शकते. कारण अशा प्रकारच्या योजनांवर कमी लक्ष दिले जाते. जे गुंतवणूकदार एसआयपीद्वारे आपली गुंतवणूक करत होते त्यांना ती आता अन्य टॅक्स सेव्हिंग फंडांकडे वळवावी लागेल. परंतु जी रक्कम आतापर्यंत गुंतवली गेली आहे ती मात्र लॉक इन कालावधी पूर्ण झाल्यावरच मिळणार आहे. 

एचडीएफसी म्युच्युअल फंडानुसार ही योजना तीन वर्षांनंतर दुसऱ्या एखाद्या इक्विटी फंडात विलीन केली जाईल. 2005 सालच्या इएलएसएस फंडांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या प्रकारच्या योजनांसाठी तीन वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. त्यामुळे 16 मे 2018 नंतरसुद्धा नवीन गुंतवणूक न स्वीकारता या योजनेचे व्यवस्थापन केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Mutual Fund stops investments in Long Term Advantage Fund