home loan
home loanesakal

Home Loan Tips: गृहकर्ज घेताय! या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

घरभाडे देण्याऐवजी स्वत:च्या घराचं ईएमआय भरणं कधीही चांगलं

स्वत: चं घर घेण्यासाठी गृहकर्ज हे सर्वात मोठं पाऊल असते. हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि हे स्वप्न प्रत्यक्षात यावं यासाठी गृहकर्ज महत्त्वाचं ठरते. आता गृहकर्ज म्हटलं की तुम्ही ईएमआयचा विचारही करणारच. घरभाडे देण्याऐवजी स्वत:च्या घराचं ईएमआय भरणं कधीही चांगलं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गृहकर्ज सहज कसं घेता येईल, या कर्जातून मुक्त कसं होता येईल, हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत....

१. घराची आवश्यकता आणि वापर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जागा का खरेदी करत आहात हे शोधून काढणे आवश्यक आहे. जागा किंवा घर तुम्ही स्वत:च्या वापरासाठी घेताय की गुंतवणुकीसाठी घेताय हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. याशिवाय फक्त जागा घ्यायचीये की जागा घेऊन त्यावर घर बांधायाचंय हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. जागेवर नवीन घर बांधणे हा खर्चिक पर्याय दिसत असला तरी दीर्घकाळाचा विचार करता दुरुस्ती आणि नुतनीकरणावरील तुमचा खर्च वाचू शकतो. घर खरेदी करत असल्यास करार करण्यापूर्वी प्लंबिग, वॉटरप्रूफिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन तपासून घ्या.

२. तुमच्या गरजेचे मापन करा

घराची आवश्यकता लक्षात आल्यानंतर आता त्या घरात तुम्ही किती लोक राहणार आहात हे समजून घ्या. यातून तुम्हाला घर किती मोठं हवं हे लक्षात येईल. 1 बीएचके आणि २ बीएचकेचा विचार करता साधारणत: ६०० ते १,००० चौरस फूट ऐवढे घर असावं. घर किती मोठं हवं यावर तुमचं बजेट आणि आर्थिक भविष्य ठरवता येईल.

३. अर्थनियोजन करा

तुम्ही नेमकं काय शोधताय याची कल्पना आल्यावर आता ते कसे मिळवायचा हा मुद्दा येतो. किती रक्कम उधार घ्यावी लागेल, तुमचे सध्याचे उत्पन्न आणि खर्च यांचा अभ्यास करा. डाउन पेमेंट म्हणून तुम्ही किती रक्कम देऊ शकता, मासिक हप्ते फेडण्यासाठी किती रक्कम बाजूला काढता येईल, याचा नीट अभ्यास करा. कर्ज फेडण्याचा कालावधी कमी व्हावा यासाठी डाऊन पेमेंट वाढवण्याचा पर्याय अनेक जण स्वीकारतात. पण भविष्यातील संकटसमयी तुम्हाला हे पैसे कामी येऊ शकतात याचा विचार डाऊनपेमेंट करताना करावा.

४. कर्ज कोणत्या बँकेतून घ्यावे?

कर्ज कोणत्या बँकेतून अथवा वित्तिय संस्थेतून घ्यावं याची यादीच तयार केली पाहिजे. तुमचे नातेवाईक, मित्र किंवा ऑफिसमधील सहकारी कर्ज घेण्याबाबत सल्ले देतील. मात्र, तुम्हाला विश्वासार्ह वाटेल, चांगले पर्याय देईल अशा बँकेतून कर्ज घ्यावे. तुम्हाला दिली जाणारी वागणूक, कंपनीच्या अटी व शर्ती, शुल्क, ईएमआय याबाबतची माहिती नीट दिली का, याचा विचार करा. बँक किंवा संस्था डिजिटली सक्षम आहे की दरवेळी बँकेतच जावे लागेल, हे देखील तपासा.

५. नियमित प्रीपेमेंट करणे

सर्व गोष्टींचे पालन केल्यावरही कधी कधी तुम्हाला ईएमआय भरताना मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी प्रीपेमेंट हा चांगला पर्याय असतो. विशेषत: जर तुम्ही तुमचे कर्ज फ्लोटिंग व्याज दराने घेतले असेल जेथे तुम्हाला कोणतेही प्रीपेमेंट शुल्क आकारले जात नाही. ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम असे दोन घटक असतात. सुरूवातीला तुमचे बहुतेक ईएमआय मुद्दलाचे व्याज भरण्यासाठी जातात हे लक्षात ठेवा.

(गौरव मोहता हे होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com