गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 एप्रिल 2019

मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता आहे. 

मात्र निवडणुकीच्या धामधुमीत ‘आरबीआय’ची व्याजदर कपात सरकारसाठी कितपत फायदेशीर ठरेल, हे बॅंकांवर कर्जस्वस्ताईवर अवलंबून राहणार आहे.  
बॅंकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपो दर कमी केला होता. मात्र त्याला बॅंकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी कर्जाचे दर अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. आजच्या पतधोरणात ‘आरबीआय’ने विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

यापूर्वी फेब्रुवारीतील विकासदराच्या अंदाजाऐवजी आज बॅंकेने यंदा ७.२ टक्के विकासदर राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त केला. अर्थव्यवस्थेसमोर अनेक समस्या आहेत. विकासाला चालना देण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्‍यक असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. चलनवाढीचा अंदाजदेखील बॅंकेने नव्याने जाहीर केला आहे. ज्यात चलनवाढ आणखी कमी होईल, असे बॅंकेने म्हटले आहे. व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी व्याजदरात सुसूत्रता आणण्याबाबत रिझर्व्ह बॅंक काम करत आहे. लवकरच ही प्रणाली लागू होईल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

बॅंकिंग व्यवस्थेतील रोखतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी नवी प्रणाली विकसित करण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न सुरू आहेत.
- शक्तिकांत दास, गव्हर्नर

बॅंकांची चालढकल
सलग दोन पतधोरणातील कपातीमुळे रेपो दर अर्धा टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र बॅंकांनी ०.०५ ते ०.१० टक्‍क्‍यांची किरकोळ कपात करून पतधोरणाला प्रतिसाद दिला. व्याजदर कपातीचा लाभ शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी बॅंकांची व्याजदर प्रणाली सुटसुटीत करण्यासाठी आरबीआय आग्रही आहे. सध्या बॅंकांकडून प्राइम लेंडिंग रेट, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (बीपीएलआर), बेस रेट आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्‌स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) या बाह्य घटकांनुसार व्याजदर निश्‍चित केला जातो.

गृह आणि वाहन कर्जावरील फायदा
(जुना व्याजाचा दर ९.७० टक्के आहे. रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या कपातीनंतर तो ९.४५ टक्के झाला असे गृहीत धरल्यास त्याचा फायदा पुढीलप्रमाणे मिळेल.)

रिझर्व्ह बॅंक पतधोरण वैशिष्ट्ये
- रेपो दरात पाव टक्‍क्‍याची कपात, रेपो दर ६ टक्के
- सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर कपात
- पतधोरण समितीतील सहापैकी चार सदस्यांचा व्याजदर कपातीला कौल
- चालू आर्थिक वर्षासाठी ७.२ टक्के विकासाचा अंदाज
- चौथ्या तिमाहीतील चलनवाढीचा अंदाज २.४ टक्‍क्‍यांपर्यंत घटवला
- उत्पादन नकारात्मक, अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Loan Vehicle Loan Rate Decrease RBI