शोकांतिका भारतातील सर्वात मोठ्या कॉफी चेन संस्थापकाची...

शोकांतिका भारतातील सर्वात मोठ्या कॉफी चेन संस्थापकाची...

मुंबई: कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला आहे. मंगळूरू येथील होईग बाजाराजवळ नदीकाठावर सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. सोमवारपासून ते बेपत्ता होते. कंपनीच्या आर्थिक संकटामुळे निराश झाल्याचे सिद्धार्थ यांचे पत्र कालच प्रसिद्धी माध्यमांसमोर आले होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या कॉफी चेनची (कॅफे कॉफी डे) स्थापना केली होती. 

देणेदार, कंपनीवरील कर्ज आणि खासगी इक्विटी भागीदार यांच्या आपण प्रचंड दबावाखाली असल्याचे सिद्धार्थ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाकडूनही प्रंचड मनस्तापाला सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र कंपनीच्या आर्थिक संकटाची तसेच गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची जबाबदारी त्यांनी स्वत:वरच घेतली आहे. त्यांच्या मृत्यूचा त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, गुंतवणूकदार आणि उद्योगजगताला मोठा धक्का बसला आहे. त्यांना शोधण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, कोस्ट गार्ड, होम गार्ड, अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.

कॅफे कॉफी डेची मुख्य प्रवर्तक कंपनी असलेल्या कॉफी डे एंटरप्राईझेस लि.चा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजारात 122.75 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे. काल सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्याची बातमी आल्यानंतर आणि आज त्यांच्या आत्महत्येची बातमी आल्यानंतर 193 रुपये प्रतिशेअर या किंमतीवरून जवळपास 20 टक्क्यांची घसरण कंपनीच्या शेअरमध्ये झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 2,603.68 कोटींचे बाजारभांडवल आहे. शेअर बाजारात सिद्धार्थ यांची बातमी आल्यानंतर रोज शेअर 20 टक्क्यांनी कोसळतोय. 

व्ही जी सिद्धार्थ यांचे वडील कॉफीच्या मळ्याचे मालक होते. सिद्धार्थ यांनी स्टारबक्ससारख्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रॅंडला भारतीय प्रतिस्पर्धी उभा केला होता. त्यांच्या कुटुंबाला 140 वर्षांचा कॉफी लागवडीचा इतिहास आहे. कॉफीच्या व्यवसायात उतरण्याआधी त्यांनी शेअर बाजारात ट्रेडिंगसुद्धा केली होती. जर्मन कॉफी चेन चिबोच्या मालकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी कॅफे कॉफी डे या कंपनीची स्थापना केली होती. 1994 मध्ये त्यांनी बंगळूरू येथे पहिले कॉफी शॉप सुरू केले होते.

ऑक्टोबर 2015 मध्ये कॅफे कॉफी डेचा आयपीओ बाजारात आला होता. त्यावेळेस त्या शेअरचा किंमतपट्टा 316 - 328 रुपये प्रति शेअर होता. या आयपीओला 4 स्टार रेटिंग मिळाले होते. हा आयपीओ 1.81 पट ओव्हरसबस्क्राईब झाला होता. कंपनीने यातून 1,150 कोटी रुपयांचे भांडवल उभारले होते. 315.70 रुपये प्रति शेअर या वर्षभरातील उचांकी स्तरावरून आज हा शेअर 122.75 रुपये प्रति शेअर या पातळीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com