‘प्राप्तिकर’कडून ४,३०० कोटींच्या बेनामी मालमत्तांवर टाच

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

नवी दिल्ली - सुधारित बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्राप्तिकर विभागाने गेल्या अठरा महिन्यांत सुमारे ४ हजार ३०० कोटी रुपयांच्य बेनामी मालमत्तेवर टाच आणली आहे. या कालावधीत बेनामी मालमत्तेची १५०० प्रकरणे उजेडात आली असून, जयपूर आणि मुंबई या शहरांमध्ये त्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

जबलपूरमधील एका चालकाकडे तब्बल ७.७ कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आढळून आली आहे. मुंबईतील एकाकडेही अशा प्रकारची मोठी मालमत्ता आढळून आली असून, ती विविध बोगस कंपन्यांच्या नावे होती. या कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे तपासात समोर आले. बेनामी मालमत्तेबाबत झालेल्या कारवाईत बिहारमधील पाटणा शहरात सर्वात कमी (३०) प्रकरणे उघडकीस आली आहेत. केंद्र सरकारने ‘बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा-१९८८’मध्ये सुधारणा करून १ नोव्हेंबर २०१६ रोजी नवीन कायदा अमलात आणला. 

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता आणि काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी मोदी सरकारकडून पावले उचचली जात असून, बेनामी मालमत्तेची माहिती देणाऱ्याला एक ते पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूद असलेल्या एका योजनेची घोषणा सरकारने नुकतीच केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax Anonymous Property