सोन्याची आयात फक्त 50 किलो; 30 वर्षांतील सर्वांत मोठी घसरण 

वृत्तसंस्था
Wednesday, 6 May 2020

भारत चीनननंतर जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे.एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे बंद होती.सोन्याच्या आयातीत मागील 30 वर्षातील सर्वांत मोठी घट झाली

नवी दिल्ली - देशात गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाउन असल्याने बहुतांश वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली आहे. याचाच परिणाम देशातील सोन्याच्या मागणीवरही झाला आहे. भारताच्या सोने आयातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात तब्बल 99.9 टक्के घट नोंदविण्यात आली. एप्रिल महिन्यात फक्त 50 किलो सोने आयात करण्यात आले आहे. 

मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारताने 110.18 टन सोने आयात केले होते. देशात यंदा मार्च महिन्यात 25 टन सोने आयात करण्यात आले होते. एप्रिलमध्ये सोने आयातीत झालेली घसरण ही गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. भारत चीनननंतर जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे. भारतात हवाई मार्गाने सोन्याची आयात केली जाते. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सोन्याच्या आयातीत मागील 30 वर्षातील सर्वांत मोठी घट झाली. नेपाळ आणि बांगलादेशमधून रस्त्याच्या मार्गे सोने आयात केले जाते. त्यामुळे अंदाजे 50 किलो सोने आयात करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षीच्या 30 हजार कोटींच्या (3.97 अब्ज डॉलर) तुलनेत एप्रिलमध्ये फक्त 21 कोटींचे (28.4 लाख डॉलर) सोने आयात केले गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाव उच्चांकी पातळीवर 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजार घसरल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याला प्राधान्य दिल्याने वायदे बाजारातील सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोचले आहेत. मात्र एप्रिल महिन्यात देशातील सराफा दुकाने बंद असल्याने प्रत्यक्ष (भौतिक) सोने उपलब्ध नसल्याने गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डच्या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीननंतर आयातीत दुसरा क्रमांक 
भारत हा चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त सोने आयात करणारा देश आहे. भारतात स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, घानाबरोबरच दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात सोने आयात केले जाते. यात स्वित्झर्लंडचा वाटा सर्वाधिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India gold imports month of April compared to the last year decline of 99percent