वाहनांचं मार्केट डाऊन; भारतात ऑटोमोबाईलमध्ये मंदी!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जून 2019

तब्बल 35,000 कोटींची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत

तब्बल 35,000 कोटींची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत

नवी दिल्ली: देशातील ऑटोमोबाईल कंपन्यांसमोरील मंदीचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसते आहे. भारतातील आघाडीच्या प्रवासी वाहन आणि दुचाकी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या निर्मिती प्रकल्पांमध्ये कपात करण्याची किंवा उत्पादन थांबवण्याची घोषणा केली आहे. चालू तिमाहीतच हा निर्णय अंमलात आणला जाणार असून त्याचा कालावधी अनेक दिवसांचा असू शकतो. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना आधीच उत्पादित करण्यात आलेल्या कार किंवा दुचाकींची थंडावलेल्या बाजारपेठेत विक्री करता येणार आहे. कारण अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांकडे वाहनांची इन्व्हेन्ट्री (अतिरिक्त वाहने) तयार झाली आहे. मात्र या उत्पादन कपातीचा मोठाच फटका कंपन्यांच्या कामगिरीवर होणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या आणि वाढीचे उद्दिष्ट गाठणे त्यामुळे अवघड होऊन बसणार आहे. बाजारात आलेल्या मंदीमुळे जून महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील तब्बल 35,000 कोटी रुपयांच्या मूल्याची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात हा फटका अधिक असून तब्बल 2.5 अब्ज किंमतीची 30 लाख दुचाकी वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. दहापैकी सात आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन मे आणि जून महिन्यात थांबल्याचे जाहीर केले आहे. यात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅंड महिंद्रा यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. यातील काही कंपन्यांनी आधीच उत्पादन कपात सुरू केली आहे तर उर्वरित कंपन्या येत्या काही दिवसांतच उत्पादन थांबवणार आहेत. 'जर विक्रीच होणार नसेल तर वाहनांचे उत्पादन करून साठा करण्यात काय अर्थ आहे. मे आणि जून महिन्यात आम्ही आमच्या उत्पादनात कपात केली आहे', असे मत टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे प्रमुख मयंक पारिख यांनी व्यक्त केले आहे.
उत्पादन कपातीमुळे मे-जून महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचे उत्पन्न 20-25 टक्क्यांनी घटणार आहे. कंपन्यांपेक्षाही डिलर्सला मोठा फटका बसला आहे. नेहमीपेक्षा 50 टक्के अधिक राखीव वाहने डिलर्सकडे पडून आहेत. 
काही निवडक वाहन उत्पादक कंपन्याचे शट-डाऊनचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

मारुती सुझूकी  - 23 जून ते 30 जून
होंडा कार्स इंडिया - 5 जून ते 8 जून
टाटा मोटर्स -  27 मे ते 3 जून 
रेनॉ निसान - 26 मे ते 5 जून
होंडा मोटरसायकल अॅंड स्कुटर्स इंडिया -  4 जून ते 11 जून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDIAN AUTOMOBILE MANUFACTURERS SHUT MANUFACTURING PLANTS TEMPORARILY TO CLEAR UNSOLD INVENTORY