(Video)  पुण्यात आली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल 

टीम ईसकाळ
Friday, 4 October 2019


 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकल आता पुण्यात देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत. त्याशिवाय रिमूव्हेबल बॅटरीचीसुद्धा सुविधा देण्यात आली आहे. सुरवातीला या मोटरसायकल दिल्लीत उपलब्ध करण्यात आली होती आता पुण्यात देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प'चे संस्थापक राहुल शर्मा म्हणाले,'' पुणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. पुण्यातून चांगली मागणी आल्यास भविष्यात पुण्यात देखील वाहनांची निर्मिती करण्याचा विचार आहे. 

रिव्हॉल्ट आरव्ही 400 आणि रिव्हॉल्ट आरव्ही 300 ही मॉडेल कंपनीने बाजारात आणली आहेत. रिव्हॉल्ट आरव्ही 400 ही देशातील इलेक्ट्रिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान असणारी पहिली मोटरसायकल आहे. रिव्हॉल्ट आरव्ही 400 मध्ये तीन प्रकार आहेत. ईको, सिटी आणि स्पोर्ट. ईको आरव्ही 400 एकदा चार्ज केल्यानंतर 156 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते असा कंपनीचा दावा आहे. तर सिटी मॉडेल 80-90 किमीचा पल्ला एकदा चार्जिंग केल्यावर गाठते. 

आरव्ही 400 मध्ये 3,000 डब्ल्यू मोटर असून, 170 एनएमचा टॉर्क देत ती 85 किमी प्रति तास हा वेग गाठू शकते. या मोटरसायकलबरोबरच चार्जरची सुविधा देण्यात आली आहे. 15 एच्या सॉकेटमध्ये हा चार्जर वापरता येऊ शकतो. मोटरसायकल पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 4 तासांपेक्षाही कमी अवधी लागतो. 

रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प या कंपनीद्वारे शर्मा यांनी एक नवेच बिझनेस मॉडल या इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायात आणले आहे. ज्याप्रमाणे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (एसएएस) हे मॉडेल असते त्याप्रमाणेच एमएएएस अर्थात मोटरसायकल अॅज ए सर्व्हिस हे मॉडेल या नव्या कंपनीने आणले आहे. या नव्या बिझनेस मॉडेल अंतर्गत ग्राहकांना कोणतीही मोठी रक्कम ही मोटरसायकल विकत घेताना द्यावी लागणार नाही. ग्राहकांना दरमहिन्याला एका छोट्या हफ्त्याच्या रुपात एक रक्कम द्यावी लागेल. त्या रकमेतच सर्व सेवांचा अंतर्भाव केलेला असेल. त्यामुळे ग्राहकांवर वेगळा मेंटेनन्स कॉस्ट, विमा यासारख्या खर्चाचा भार पडणार नाही.

इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय हे एक नवे क्षेत्र असून त्यासाठी ते विकण्याचे तंत्रही नवे हवे असे शर्मा यांचे म्हणणे आहे. देशातील प्रत्येक नागरिक अगदी विद्यार्थ्यांनासुद्धा परवडेल अशा किंमतीत ही नवी मोटरसायकल मिळणार आहे. रिव्हॉल्टची विक्री स्टोअरमधून आणि ऑनलाईनसुद्धा केली जाणार आहे. दिल्लीनंतर आता पुण्यात गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian electric motorcycle startup Revolt open new hubs in Pune