शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी बुडाले

sharemarket
sharemarket

मुंबई - जागतिक शेअर बाजारांमधील नकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये अडीच टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०६६ अंशांनी; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९० अंशांनी घसरला. निफ्टी १२ हजारांच्या स्तरापासून तर शेअरबाजार ४० हजारांच्या स्तरापासून खाली आला. यामुळे सेन्सेक्‍समधील समभागांचे एकूण मूल्य कालच्या तुलनेत आज तीन लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

गेले सलग दहा दिवस भारतीय शेअर बाजार तेजीत होता. त्या वाढीला आज लगाम बसला. काल मुंबई शेअर बाजारातील सर्व समभागांचे मिळून एकत्रित मूल्य १६०.५६ लाख कोटी रुपये होते. ते आज १५७.२४ लाख कोटी रुपये एवढे झाले. दिवसअखेर शेअर बाजार ३९,७२८.४१ अंशांवर तर निफ्टी ११,६८०.३५ अंशांवर बंद झाला.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे युरोपात लादलेले निर्बंध व अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी नवे आर्थिक पॅकेज येण्याची धूसर झालेली शक्‍यता यामुळे आज तेथील बाजार अडीच टक्के गडगडला. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही झाला. सकाळच्या सत्रात बाजार थोडा तेजीत होता; मात्र तासाभरानंतर घसरण सुरू झाली. दुपारनंतर घसरण तीव्र होऊन निर्देशांकाने ४०,५०० व ४०,००० हे स्तरही खालच्या दिशेने तोडले. प्रामुख्याने आज आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे दर घसरले. अर्थात निर्देशांकांमधील घसरण एवढी सर्वदूर होती की, निर्देशांकामधील ३० प्रमुख समभागांपैकी फक्त एशियन पेंट्‌स सहा रुपयांच्या किरकोळ वाढीसह २०७८ रुपयांवर बंद झाला; तर निफ्टीच्या ५० प्रमुख समभागांपैकी फक्त एशियन पेंट्‌स, कोल इंडिया व जेएसडब्ल्यू स्टील हे तीनच समभाग किरकोळ वाढीसह बंद झाले. अन्य सर्व समभाग पावणेपाच टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक घसरण
सेन्सेक्‍समधील बजाज फायनान्समध्ये आज सर्वांत जास्त म्हणजे ४.६८ टक्के (१५७ रुपये) घसरण झाली व तो ३२१३ रुपयांवर बंद झाला. ८१ रुपयांनी घसरलेला रिलायन्स २,२०५ रुपयांवर स्थिरावला. एचडीएफसी बॅंक ४१ रुपयांनी (बंद भाव १,१६९ रु.) तर कोटक बॅंक ४५ रुपयांनी (बंद भाव १,३०९ रु.) घसरला. १९७ रुपयांनी घसरलेला बजाज फिनसर्व्ह ५,९०० रुपयांवर तर ७१ रुपयांनी घसरलेला टीसीएस २,७३८ रुपयांवर बंद झाला. भारती एअरटेल १५ नोव्हेंबरनंतर आज प्रथमच ४०० रुपयांखाली (३९९.१५) गेला. मार्च महिन्यातील पडझडीतही त्याने ४०० चा स्तर टिकवून ठेवला होता. आज सन फार्मा ५०० रुपयांखाली तर लार्सन टुब्रो ९०० रुपयांखाली गेला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com