
महागाईने मोडला ८ वर्षांचा विक्रम; किरकोळ बाजारात आणखी भडका
नवी दिल्ली - मशीद, मंदिर, ताजमहाल वगैरे वगैरे मुद्यांच्या - चक्कर गिन्नी पध्दतीच्या गदारोळात सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब आणखी वाढवणारी बातमी आली असून ती कंबरतोड महागाई केवळ महिनाभरात आणखी वाढल्याची आहे. एप्रिल महिन्यांतील आकडेवारीनुसार किरकोळ बाजारातील महागाईने मागील ८ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सरकारने आजच जाहीर केलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेल्या महागाईचा एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतका भडका उडाला आहे. ही वाढ १ टक्के इतकी दाखविली जात असली तरी किरकोळ बाजारपेठेच्या हिशोबांनुसार सर्वसामान्यांवरील त्याचा बोजा प्रचंड असणार आहे.
पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत असून त्याचा परिणाम दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे दरही चढे होण्यात होत आहे. तेल, तांदूळ, डाळींपेक्षा भावनात्मक मुद्देच महत्वाचे आहेत काय, अशी शंका येण्यासारख्या प्रचाराने ध्वनीमर्यादेचेही नियम तोडल्याची परिस्थिती आहे. मात्र सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंचा भडका उडविणारा महागाईचा आलेख सातत्याने वाढत असून मार्चच्या तुलनेत किरकोळ महागाईमध्ये १ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाईमध्ये १ टक्का वाढ झाली आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ बाजारातील महागाई दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे आदेश दिले त्यानंतर ही नवी आकडेवारी आली आहे. यानुसार ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या (सीपीआय) जवळपास निम्मी असलेली अन्नधान्य महागाई एकट्या एप्रिलमध्ये प्रचंड वाढल्याने हा निर्देशांत उच्चांकावर पोहोचला आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीतही झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्या आता आणखी वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
सीपीआयवर आधारित महागाईचा आकडा सलग चौथ्या महिन्यात अशा गतीने वाढला आहे की रिझर्व बॅकेच्या अंदाजांच्या किंवा सहनशीलतेच्या सीमारेषाही तो तोडून गेला आहे. २०२२ उजाडल्यापासून देशातील महागाईचा दर सातत्याने ६.५० टक्क्यांच्या वरच राहिलेला आहे. सीपीआयनुसार मागच्या वर्षी एप्रिलमध्ये ४.२३ वर असणाऱया महागाई निर्देशांक दराने यंदाच्या मार्चमध्ये ६.५९ टक्के इतकी झेप घेतली. मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये १.९६ टक्क्यांवर असलेली महागाईची टक्केवारी मागच्या महिन्यात मात्र ७.६८ टक्के झाली होती.
महागाईचा चढता आलेख कायम सतानाच रिझर्व बॅंकेने मागील महिन्यात रेपो दरांत अचानकपणे ४.४० टक्के इतकी वाढ करून सामान्य देशवासीयांना आणखी झटका दिला. रिझर्व बॅंकेने ४ वर्षांत प्रथचम हा दर वाढवला होता.
दरम्यान देशातील औद्योगिक उत्पादनात मार्च २०२२ मध्ये १.९ टक्के वाढ झाल्याचे केंद्राने जाहीर केले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार (एनएसओ) त्याआधी मार्च २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनवाढ ०.९ टक्के होती.
Web Title: Inflation Breaks 8 Years Record Further Eruptions In The Retail Market
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..