इन्फोसिसची विक्रमी घसरगुंडी 

पीटीआय
Wednesday, 23 October 2019

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग १६.२१ टक्‍क्‍याने गडगडून ६४३ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या समभागाची ही एप्रिल २०१३ नंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा समभाग १६.६५ टक्‍क्‍यांनी कोसळून ६४० रुपयांवर बंद झाला.

नवी दिल्ली - इन्फोसिसमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून कंपनीचा समभाग मंगळवारी सुमारे १६ टक्‍क्‍याने कोसळला. यामुळे कंपनीचे बाजारभांडवल ५३ हजार ४५१ कोटी रुपयांनी कमी झाले. 

इन्फोसिसच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीचे उत्पन्न आणि नफा वाढवून दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा फटका आज शेअर बाजारात कंपनीच्या समभागाला मोठ्या प्रमाणात बसला. मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग १६.२१ टक्‍क्‍याने गडगडून ६४३ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या समभागाची ही एप्रिल २०१३ नंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा समभाग १६.६५ टक्‍क्‍यांनी कोसळून ६४० रुपयांवर बंद झाला. 

आजच्या पडझडीत कंपनीचे बाजारभांडवल ५३ हजार ४५० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. कंपनीचे बाजारभांडवल २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपयांवर आले आहे. सेन्सेक्‍स आणि निफ्टीमधील आघाडीच्या कंपनीच्या समभागाला बसलेला हा मोठा फटका आहे. 

कर्मचाऱ्याचे पत्र
गेल्याच आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आल्याचा आरोप एका कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चारपानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने पत्रात केला आहे. पत्राखाली नाव न लिहिता कंपनीच्या संचालक मंडळाला हे पत्र रविवारी लिहिले होते. 

या पत्रामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी सलील पारेख संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, याबाबतचे म्हणणे लेखापरीक्षण समितीपुढे मांडले असल्याचे पारेख यांनी स्पष्ट केले आहे. तर, पत्रात करण्यात आलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

व्हेरिझोन, इंटेल, एबीएन ॲम्रो आदींच्या अधिग्रहणाद्वारे झालेले महसुली उत्पादन ताळेबंदात नमूद केले त्याप्रमाणे प्रत्यक्षात नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जागल्याने केलेल्या आरोपांचा कंपनीची लेखापरीक्षण समिती स्वतंत्रपणे तपास करेल. समितीने स्वतंत्र अंतर्गत लेखापरीक्षक ‘ईवाय’शी सल्लामसलत सुरू केली आहे. यासोबत शार्दूल अमरचंद मंगलदास अँड कंपनीला स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. 
- नंदन नीलेकणी, अध्यक्ष, इन्फोसिस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys share price crash