'जेट'चे वैमानिक आजपासून संपावर 

Jet Airways
Jet Airways

नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक "काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या "जेट'ने आंतरराष्ट्रीय सेवा चार दिवसांपासून रद्द केली असून, वैमानिकांच्या संपामुळे देशांतर्गत सेवाही कोलमडणार आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, रविवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर "जेट'च्या शेकडो कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी निदर्शने केली. 

"जेट'कडे 1600 वैमानिक आहेत. त्यांच्यासह अभियंते आणि वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. कंपनीने इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतनदेखील अदा केलेले नाही. वारंवार कंपनीकडून आश्‍वासन दिले जाते. मात्र, कार्यवाही होत नसल्याने वैमानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. साडेतीन महिन्यांपासून वेतन थकलेले आहे. ते कधी मिळणार, याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. परिणामी, सोमवारी (ता. 15) सकाळी 10 वाजल्यापासून संघटनेचे 1100 वैमानिक विमानांचे उड्डाण करणार नाहीत, असे नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने म्हटले आहे. रविवारी दिल्लीत कर्मचाऱ्यांनी "जेट वाचवा'ची हाक देत जोरदार निदर्शने केली. त्याआधी शुक्रवारी मुंबईत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, जेट एअरवेजची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने काही कर्मचारी "स्पाइसजेट'मध्ये रुजू झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय सेवा बंद 
तिजोरीतील खडखडाटामुळे जेट एअरवेजने 16 एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय सेवा रद्द केली आहे. ऍम्स्टरडॅम, पॅरिस, टोरंटो, लंडन आणि सिंगापूर येथे जाणारी विमाने रद्द करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबई-पॅरिस या मार्गावरील 10 जूनपर्यंतची आगाऊ नोंदणी बंद करण्यात आल्याचे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

पैसे परत करण्यास दिरंगाई 
विमानसेवा रद्द केल्याबद्दलची पूर्वसूचना किंवा कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांनी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे जेटविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्याशिवाय, विमानसेवा रद्द झालेल्या प्रवाशांना तीन आठवडे उलटले, तरी तिकिटाचे पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये जेट एअरवेजविरोधात संतापाची लाट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com