'जिओ'ची जादू कायम...

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकीकडे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. जानेवारीमध्ये  दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांची संख्या 1.56  कोटींनी कमी होऊन 117.50 कोटींवर पोचली आहे. 

मुंबई: दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत भारतीयांना मोफत 4जी फोन देण्याची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकीकडे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. जानेवारीमध्ये  दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांची संख्या 1.56  कोटींनी कमी होऊन 117.50 कोटींवर पोचली आहे. 

 एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी मिळवलेल्या नव्या ग्राहकांपेक्षा या कालावधीत जिओने दुप्पट नवीन जोडले आहेत. जिओने 83 लक्ष नवीन ग्रहक जोडल्याने जिओच्या ग्राहकांची एकूण संख्या 16.83 कोटींवर पोचली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलकडे सध्या एकूण 29.61 कोटी ग्राहक आहेत. मात्र त्यात जानेवारीमध्ये केवळ 15 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. आयडियाने या कालावधीत 11 लाख  ग्राहक जोडले आहेत. त्यांची एकूण संख्या 19.76 कोटींवर पोचली आहे. तर त्यापाठोपाठ व्होडाफोनने 12.8 लाख नवीन ग्राहक जोडत एकूण संख्या 21.38 कोटींवर पोचली आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या बीएसएनएलने 39  हजार नवीन ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या  जानेवारीअखेरीस 10.83 कोटींवर जाऊन पोचली आहे. 

दरम्यान, डिसेंबरमध्ये  आरकॉमने दूरसंचार सेवा बंद केल्याने दोन कोटी ग्राहक गमावले. याव्यतिरिक्त, एअरसेलने 34 लाख तर आणि टाटा टेलिसर्व्हिसेसने 19 लाख गमावले आहेत.

जिओने येत्या 12 महिन्यांत देशातील 99% लोकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिओकडून रोजच नवीन ऑफर आणि सवलतींचा वर्षाव केला जात असतो. त्यामुळे एका सेकंदात 'जिओ'शी 7 ग्राहक जोडले जातात. देशात दर एका सेकंदाला सात लोक जिओची कुठली ना कुठली सेवा वापरत असतो. अंबानी यांनी 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत सर्वांना फ्री डेटा उपलब्ध करून दिल्याने मोबाइल डेटा वापरात भारताने आता चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio User Base Rises By 8.3 Million in January