देशात नोकऱ्यांची स्थिती उत्तम; कंपन्यांनी भरतीचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs news Companies increased recruitment 29 percent mumbai

देशात नोकऱ्यांची स्थिती उत्तम; कंपन्यांनी भरतीचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढवले

मुंबई : विकसित देशांमध्ये मंदीची भीती व्यक्त होत असली तरी आपल्या देशात मात्र नोकऱ्यांची स्थिती उत्तम असल्याचे दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत कंपन्यांनी नोकरभरतीचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढवले आहे. त्या आधीच्या तिमाहीत हे प्रमाण २० टक्के होते. इंडिड इंडिया संस्थेने त्रैमासिक सर्वेक्षणाच्या आधारे हे निष्कर्ष जारी केले आहेत.

या तिमाहीतही माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राने आपले आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. या तिमाहीत या क्षेत्रात गेल्या तिमाहीतील ८३ टक्क्यांच्या तुलनेत ९१ टक्के कंपन्यांनी भरती केली आहे. डिझाइन क्षेत्रात हे प्रमाण १५ टक्क्यांवरून ३३ टक्के, ऑपरेशन्स, अॅडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात हे प्रमाण २९ टक्क्यांवरून २१ टक्के आणि अकाउंट्स, फायनान्समध्ये २१ टक्क्यांवरून २६ टक्के कंपन्यांनी भरती केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.आरोग्यसेवा क्षेत्रात भरतीचे प्रमाण ५१ टक्क्यांवरून ८६ टक्के झाले, तर ई-कॉमर्समध्ये ७३ टक्क्यांवरून ८२ टक्के झाले. यावरून या क्षेत्रात मागणी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच शहरांच्या तुलनेत महानगरांमध्ये भरतीचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात बंगळुरू आघाडीवर असून त्यामागोमाग मुंबई आणि चेन्नईचा क्रमांक आहे. चंदीगडसारख्या शहरानेही चांगली वाढ नोंदवली आहे. नोकरी शोधणार्‍या दहापैकी सहा उमेदवारांनी नोकर भरतीवर महागाईचा फारसा परिणाम झालेला नाही असे म्हटले आहे. तर ८९ टक्के कंपन्यांनी महागाईमुळे कर्मचारी भरती आणि पगाराच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता फेटाळली आहे. कारण कंपन्यांनी या तिमाहीत भरती करताना उमेदवारांच्या अपेक्षा तसेच खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा कंत्राटी पद्धतींचा वापर केला आहे. कंपन्यांनी जवळपास १९ टक्क्यांपेक्षा अधिक कंपन्यांनी कंत्राटी कामगार घेण्यावर भर दिला.

महागाईच्या पार्श्वभूमीवर, २७ टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध अपेक्षांपैकी पगारवाढीची अपेक्षा पूर्ण करणे सर्वांत कठीण असल्याचे म्हटले आहे. इच्छूक उमेदवारांमध्ये ६३ टक्के जणांनी पूर्णवेळ कामाला पसंती दिली.

शहरे आणि भरतीचे

प्रमाण (टक्क्यांमध्ये)

नाव पहिली तिमाही आधीची तिमाही

बंगळुरू ९३ ८७

मुंबई ८७ ७७

चेन्नई ८२ ७१

चंदीगड ५९ ३९

पुढील काही तिमाहींमध्ये आयटी, हेल्थकेअर, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रासह फाइव्ह जीच्या आगमनाने, दूरसंचार क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ दिसून येईल,

-शशी कुमार, विक्री विभाग प्रमुख, इंडिड इंडिया.

Web Title: Jobs News Companies Increased Recruitment 29 Percent Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..