
यावर्षीच्या बजेटमध्येही महत्त्वपूर्ण असेल बदल होणार आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे बजेटची छपाई आणि ते सादर करण्याची पद्धत.
नवी दिल्ली : केंद्रीय बजेट सरकारच्या कामकाजातील महत्त्वाची गोष्ट असते. देशातील जनसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी ही घटना असते. बजेट तयार करण्यात, ते छापण्यात, सादर करण्यात कालानुरुप बदल झाले आहेत. यावर्षीच्या बजेटमध्येही महत्त्वपूर्ण असेल बदल होणार आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे बजेटची छपाई आणि ते सादर करण्याची पद्धत. यावर्षीच्या बजेटचं वैशिष्ट्य आहे ते पेपरलेस बजेट.
हो! कोरोना महामारीमुळे यावर्षीचे केंद्रीय बजेट 'पेपरलेस बजेट' असणार आहे. याचा अर्थ हे बजेट कागदावर छापले जाणार नाहीये. हे बजेट पूर्णपणे कागदाशिवाय सादर केले जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असणार आहे जेंव्हा याप्रकारचे बजेट सादर केले जाणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेट छापले जाणार नाहीये. दरवर्षी केंद्रीय बजेट अर्थ मंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापलं जातं. जवळपास 100 कर्मचारी या प्रक्रियेवर काम करत असतात. यामध्ये बजेट छापणे, ते सील करणे आणि बजेटच्या दिवशी ते पोहचवणे यासारख्या कामांची तयारी 15 दिवस आधीपासून केली जाते.
लेदर ब्रीफकेसपासून ते वहिखात्याचा प्रवास
याआधी भारताच्या इतिहासातील सगळे बजेट अर्थमंत्र्यांनी लेदरपासून बनलेल्या ब्रीफकेसमधून घेऊन गेले आहेत. या परंपरेची सुरवात देशाचे पहिले अर्थमंत्री (1947-1949) षणमुखम चेट्टी यांनी केली होती. मात्र, या परंपरेला मोडत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या दोन वर्षात बजेट एका वेगळ्या माध्यमातून नेण्यात आलं. 2019 आणि 2020 साली अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट लाल रंगाच्या पारंपारिक वहिखात्याच्या स्वरुपात नेलं. आणि नवाच पायंडा पाडला होता.
यंदाचं बजेट 'पेपरलेस'
मात्र, यावर्षी कोरोना महासंकटामुळे सरकारने यावर्षीचे बजेट न छापण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षेी बजेटची सॉफ्ट कॉपी दिली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने म्हटलंय की, युनियन बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हेचे दस्ताऐवज न छापले जाता त्याची सॉफ्ट कॉपी दिली जाणार आहे. संसदेच्या सर्वच सदस्यांना या बजेटची सॉफ्ट कॉपीच मिळणार आहे.
बजेटच्या छपाईचा इतिहास
बजेटचे दस्ताऐवज पूर्वी राष्ट्रपती भवनात छापले जायचे. मात्र 1950 मध्ये बजेट पेपर गहाळ झाल्याने त्यानंतर हे बजेट दिल्लीच्या मिंटो रोडवरील सिक्योरिटी प्रेसमध्ये छापले जाऊ लागले. त्यानंतर 1980 पासून बजेट पेपर नॉर्थ ब्लॉकमधून छापले जाऊ लागले. सुरवातीला बजेट इंग्रजीमध्ये असायचं. मात्र 1955-56 पासून बजेटचे दस्ताऐवज हिंदी भाषेत देखील तयार केले जाऊ लागले.
1 फेब्रुवारीला सादर होईल बजेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. संसदेच्या बजेटचं सत्र यावर्षी 29 जानेवारी रोजी सुरु होणार आहे. ते 8 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. हे दोन भागांमध्ये असणार आहे. पहिला टप्पा जानेवारीमध्ये सुरु होऊन ते 15 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहिल तर दुसरा टप्पा 8 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत असणार आहे. 16 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत ब्रेक असेल. मागच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन आयोजित केलं नव्हतं.