मोठा दिलासा: 'जीएसटी रिटर्न' भरण्यासाठी तीन महिने मुदतवाढ 

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

केंद्र सरकारने जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देऊ केली आहे

नवी दिल्ली:  केंद्र सरकारने जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देऊ केली आहे. चालू महिन्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत असलेली मुदत आता तीन महिन्यांनी वाढवत ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेरच्या दिवसात जीएसटी भरण्यासाठी व्यावसायिकांनी घाई केली होती. त्याच दरम्यान जीएसटी भरण्याची साईट देखील सतत 'हँग' होत असल्याने व्यावसायिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. शिवाय देशभरातील विविध ठिकाणी आणि मुख्यतः महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवल्याने व्यावसायिक आधीपासूनच त्रस्त होते. त्यांच्यासाठी  जीएसटीचे विवरणपत्र भरणे अत्यंत अवघड झाले होते.

भारतभर नवीन कर प्रणाली अर्थात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू केल्यानंतर यात विविध विविध सुधारणा करण्यात आल्या होत्या. या नवीन सुधारणेसह  रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2019 होती. मात्र सतत बदल होत असल्याने व्यावसायिकांबरोबर कर सल्लागारांना देखील समस्या येत होत्या. तसेच राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाकडून अंतिम तारीख पुन्हा वाढविण्यासाठी मागणी करण्यात आली होती. अखेर  केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last date to file GST annual returns extended till November 30