मेहुल चोक्सी आता म्हणतोय, वादळामुळे वकीलपत्र पाठविले नाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 July 2019

- हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने केला हा दावा.

मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला. 

पंजाब नॅशनल बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणात चोक्‍सी प्रमुख आरोपी आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून या वर्षी जानेवारीमध्ये घोषित केले आहे. विशेष न्यायालयाने एका आदेशाद्वारे ही कारवाई केली. याविरोधात चोक्‍सीने उच्च न्यायालयात अपील केले आहे. मात्र, नियमानुसार तीस दिवसांमध्ये वकालतनामा कागदपत्रांसह दाखल करणे आवश्‍यक असते. परंतु ही सर्व कार्यवाही करण्यास त्याला विलंब झाला आहे.

सध्या तो कॅरिबीयन खंडामध्ये अँटिग्वामध्ये असून, तेथील नागरिकत्व त्याने घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे आलेल्या तूफानी वादळांमुळे तेथे अत्यंत बिकट अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळेस सर्व जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे कुरियर आणि अन्य संबंधित सेवादेखील विस्कळीत होत्या. ही सर्व स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मोठा अवधी जावा लागला. त्यामुळे मी वकालतनामा कागदपत्रे कुरिअर सेवेने माझ्या वकिलांकडे पाठवू शकलो नाही, असे त्याने न्यायालयाला अपील याचिकेमध्ये कळविले आहे.

चोक्‍सीची याचिका दाखल करण्यासाठी विलंब झाला असला तरी वादळामुळे तेथून काही पाठविणे शक्‍य झाले नाही, असे कारण त्याने दिले आहे. वकालतनामा स्वाक्षरी करुन त्याने जून 18 ला पाठविला जो त्याच्या वकिलांना ता. 24 ला मिळाला, असेही यामध्ये स्पष्ट केले आहे. न्यायलयात बाजू मांडणाऱ्या वकिलाकडे अशिलाचा वकालतनामा असणे बंधनकारक आहे. याआधी त्याने तब्येतीचे कारण दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the Lawyer did not send the letter because of the storm