एलआयसीच्या आयपीओची अवघ्या दोन दिवसांत १.०३ पट नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC IPO
एलआयसीच्या आयपीओची अवघ्या दोन दिवसांत १.०३ पट नोंदणी

एलआयसीच्या आयपीओची अवघ्या दोन दिवसांत १.०३ पट नोंदणी

मुंबई - देशातील सर्वांत मोठा आयपीओ असलेल्या एलआयसीच्या आयपीओची अवघ्या दोन दिवसातच १.०३ पट नोंदणी झाली आहे. आज संध्याकाळी आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण १६.२ कोटी शेअर विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. आतापर्यंत १६.६८ कोटी शेअरसाठी बोली लागली आहे. पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या शेअरची ३.११ पट, कर्मचारी वर्गासाठी राखीव असलेल्या शेअरसाठी २.२१ पट मागणी नोंदवली गेली आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी ९३ टक्के मागणी नोंदवली असून, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव कोट्यातील ४० टक्के शेअरसाठी बोली लावली आहे. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४७ टक्के भाग घेतला आहे.

गुंतवणूकदारांना सुट्टीच्या दिवशीही आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने या आयपीओसाठी शनिवारीही बँका खुल्या ठेवण्यास सांगितले होते. आता रविवारीही एएसबीए प्रणाली असलेल्या शाखा फक्त याच कामासाठी खुल्या राहतील, असे रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही यांनी म्हटले आहे.

एएसबीए पद्धतीत गुंतवणूकदाराच्या त्या बँकेतील खात्यात तेवढी रक्कम असणे आवश्यक असते. त्यानुसार आयपीओसाठी अर्ज केला की, तेवढी रक्कम बँकेतर्फे त्यांच्या ताब्यात घेतली जाते (ब्लॉक केली जाते) व जेवढ्या रकमेचे शेअर गुंतवणूकदाराला मिळतात. त्याची रक्कम वगळून उरलेली रक्कम लगेच खातेदाराला वापरता (अनब्लॉक) येते. विशिष्ट शाखांमध्येच ही प्रणाली असते. त्यामुळे आयपीओसाठी सर्व रकमेचा धनादेश द्या व अॅलॉटमेंटनंतर पैसे परत येण्याची वाट पाहा हा त्रास वाचतो.

रविवारीही अर्ज देण्याची संधी

एलआयसीच्या आयपीओसाठी अर्ज देता यावेत यासाठी एएसबीए प्रणाली असलेल्या बँक शाखा रविवारीही (८ मे) खुल्या ठेवता येतील, असे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने काढले आहे. आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जेवढ्या शेअरसाठी मागणी करायची आहे, त्याचे पैसे देण्यासाठी एएसबीए (अॅस्बा) प्रणाली वापरली जाते.

Web Title: Lic Ipo Registers 103 Times In Just Two Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Registration FeeLIC IPO
go to top