बॅंकांकडून विक्रमी कर्जवाटप 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

बॅंकांनी मासिक आधारावर फेब्रुवारीच्या तुलनेत झालेल्या कर्जवाटपाचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. बॅंकांकडून बहुतेक सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणत कर्जवाटप झाले आहे. 

मुंबई - मार्च महिन्यातील शेवटच्या टप्प्यात देशव्यापी लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्याने उद्योग - अर्थव्यवस्था ठप्प होऊनही बॅंकांकडून विविध क्षेत्रांना होणाऱ्या कर्जवाटपात मोठी वाढ झाली, असे "एसबीआय रिसर्च इकोरॅप'च्या अहवालात म्हटले आहे. बिगरबॅंकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्राला झालेल्या पतपुरवठ्यात मार्चमध्ये तब्बल 1.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही 2008 नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॅंकांनी मासिक आधारावर फेब्रुवारीच्या तुलनेत झालेल्या कर्जवाटपाचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. बॅंकांकडून बहुतेक सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणत कर्जवाटप झाले आहे. एनबीएफसी खालोखाल उद्योग क्षेत्राला झालेल्या पतपुरवठ्यात फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 1.34 लाख कोटींनी वाढ नोंदविण्यात आली आहे. ती मागील 147 महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांच्या कर्जातही 0.67 लाख कोटींची वाढ होऊन ते मागील 24 महिन्यांतील उच्चांकी आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलेल्या कर्जात 0.46 लाख कोटींनी वाढ होऊन झाली आहे. ही वाढ मागील 12 महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. किरकोळ क्षेत्राला झालेले कर्जवाटप 0.36 लाख कोटींनी वाढून ते फेब्रुवारीच्या तुलनेत जास्त आहे. 

शेवटच्या आठवड्यात मोठी वाढ 
कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांना अर्थपुरवठा व्हावा, या हेतूने विशेषतः मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पतपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात बॅंकांनी कंपन्यांच्या वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोनमध्ये वाढ केली आहे. वर्किंग कॅपिटल पतपुरवठ्यात 97 हजार 910 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"एनपीए'मध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्‍यता 
देशातील लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यामुळे बॅंकांची थकीत कर्जे (एनपीए) दुप्पट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. "रॉयटर्स' वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बॅंकांच्या एकूण कर्जवाटपापैकी सप्टेंबर 2019 अखेर तब्बल 9.35 लाख कोटी रुपये कर्जे थकीत आहेत. बॅंकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत हे प्रमाण 9.1 टक्के आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan allocation from banks NBFC credit highest

Tags
टॉपिकस