
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत शून्य विक्री नोंदवली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत शून्य विक्री नोंदवली आहे. कोविड-१९ महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शोरुम बंद असल्याचा फटका कंपनीला बसला आहे. मारुती सुझुकीला त्यामुळे या कालावधीत कोणताही विक्री करता आलेली नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व उत्पादन प्रकल्पदेखील बंद करण्यात आलेले आहेत. मात्र सरकारने बंदरांमधील कामकाजास परवानगी दिल्यानंतर कंपनीने मुंद्रा बंदरातून ६३२ वाहनांची निर्यात केली आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
२३ मार्चला मारुती सुझुकीने कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राम आणि माणेसर येथील उत्पादन प्रकल्पांमधील कामकाज बंद करत असल्याचे जाहीर केले होते. मार्च महिन्यात कंपनीचे उत्पादन ३२ टक्क्यांनी घटले होते. मारुती सुझुकीने मार्चमध्ये ९२,५४० वाहनांचे उत्पादन केले होते. तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने १,३६,२०१ वाहनांचे उत्पादन केले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोविड-१९ महामारीचा फटका बसून मार्च महिन्यात देशातील प्रवासी वाहनांच्या उत्पादनात आणि विक्रीत चांगलीच घट झाली आहे. आधीच अडचणीत असलेले ऑटोमोबाईल क्षेत्र यामुळे आणखीच संकटात सापडले आहे. सर्वच वाहन उत्पादन कंपन्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लॉकडाऊन संपल्यावरही वाहन विक्री मोठी घट होण्याची शक्यता कोविड-१९ महामारीमुळे भारतातील वाहन उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता याआधीच क्रिसिलने व्यक्त केली आहे. क्रिसिल ही एक रेटिंग एजन्सी आहे. कोविड-१९ महामारीमुळे २
२०२०-२१ या आर्थिक वर्षात देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट होण्याची शक्यता क्रिसिलने व्यक्त केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरसुद्धा वाहनांच्या विक्रीला फटका बसणार असून वाहन विक्रीतील घट सुरू राहील असा अंदाज क्रिसिलच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
सद्यपरिस्थितीत बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आणि शोरुम, डिलरशीप यांचे कामकाज ठप्प झालेले आहे. सरकारकडून विविध पातळ्यांवर मिळणाऱ्या परवानग्यांनुसार कामकाज सुरळीत होणे अवलंबून असणार आहे. मागील वर्षभरात आधीच वाहनांच्या विक्रीत घसरण होत होती. मार्चनंतर तर वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. क्रिसिलने देशातील जिल्हावार वाहन विक्रीचे विश्लेषण आपल्या अहवालात केले आहे. जर कामकाज लवकरच सुरळीत झाले नाही तर वाहन विक्रीत ५० टक्के घट होण्याचा अंदाजही क्रिसिलने व्यक्त केला आहे.
कोविड-१९ महामारीचा फैलाव जगभर झालेला असल्यामुळे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. याचाही फटका वाहन उत्पादक कंपन्यांना बसला आहे. देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातील बाजारपेठांमधूनदेखील भारतीय ऑटोमोबाईल कंपन्या मोठा महसूल कमावत असतात. अलीकडेच निर्यातीसंदर्भात सरकारने काही कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच अधिकाधिक वाहनांची निर्यात करून महसूल मिळवण्याकडे देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
भारताबरोबरच जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांना कोविड-१९ महामारीचा मोठा फटका बसला आहे. जगभरातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या मंदीला सामोरे जात होत्या. मागील वर्षभरापासून जगभरातील वाहनांच्या विक्रीत मोठी घट होताना दिसून येत होती. त्यातच जगातील आघाडीच्या अनेक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प चीनमध्ये आहेत. चीनमध्ये जानेवारीपासूनच कोविड-१९चा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरूवात झाल्याने लॉकडाऊन सुरू झाले होते. त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादनांवर झाला होता. त्यातच जगभरातील असंख्य सुट्या भागांचे उत्पादन चीनमध्ये होत असल्यामुळे पुरवठा साखळीच धोक्यात आली आहे. असंख्य कंपन्यांना सुट्या भागांअभावी मालाचे उत्पादन करण्यात अवघड होऊन बसले आहे.