"लंबी रेस का घोडा' 

मंदार जामसांडेकर 
Monday, 20 July 2020

सध्या शेअरचा भाव बराच ताणलेला दिसत आहे. म्हणून कोणतीही मोठी उलाढाल वरच्या बाजूस त्वरित अपेक्षित नाही आणि अल्पावधीसाठी भाव आहे,तिथेच खेळता राहू शकतो.म्हणून अल्पावधीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक टाळावी.

कोरोनामुळे अनेक उद्योग संकटात सापडलेले असताना, दुसरीकडे "रिलायन्स इंडस्ट्रीज'च्या शेअरच्या कामगिरीने गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेतले आहे. तांत्रिक विश्‍लेषणातून या शेअरचे भवितव्य कसे दिसते, हे पाहण्याचा प्रयत्न करूया. 

- एकंदरीत "रिलायन्स'चा चार्ट पाहिल्यास असे लक्षात येईल, की रु. 1620 ही एक महत्त्वपूर्ण पातळी होती, जिथे हा शेअर डिसेंबर 2019 ते जून 2020 दरम्यान प्रतिकार पातळीचा (रेझिस्टन्स) सामना करीत होता. 

- अनेकवेळा भाव या पातळीवर पोचला, की विक्रीचा दबाव वाढायचा. परंतु जून 2020 च्या मध्यात मात्र त्याने रु. 1620 ची पातळी तोडण्यास यश मिळविले आणि पुढच्या एका महिन्यात तो रु. 1978 च्या विक्रमी पातळीवर वेगाने पोचला. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

- गेल्या चार महिन्यांत म्हणजेच मार्च 2020 मध्ये रु. 900 पर्यंतची नीचांकी पातळी गाठल्यानंतर या शेअरने 15 जुलै 2020 रोजी 100 टक्‍क्‍यांहून अधिक परतावा मिळवत रु. 1978 चा उच्चांक गाठला. 

- सध्याच्या पातळीवर या शेअरला रु. 1900 ते 1980 या प्रतिकार पातळीचा सामना करावा लागू शकतो. खालील बाजूस रु. 1800-1700-1620 ही आधार पातळी आहे. 

- "बाय ऑन एक्‍स्पेक्‍टेशन, अँड बुक प्रॉफिट ऑन न्यूज,' हे शेअर बाजाराचे मूळ तत्व या शेअरमध्येदेखील दिसून आले आहे. 

- गेल्या चार महिन्यांत वाढलेला भाव, रु. 1620 या "रेझिस्टन्स'चा वरील ब्रेकआउट आणि मार्चपासून आतापर्यंत 100 टक्‍क्‍यांहून अधिक परतावा हे सर्व नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतील घोषणांच्या अपेक्षेमुळे घडत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- सध्या शेअरचा भाव बराच ताणलेला दिसत आहे. म्हणून कोणतीही मोठी उलाढाल वरच्या बाजूस त्वरित अपेक्षित नाही आणि अल्पावधीसाठी (3 ते 6 महिने) भाव आहे, तिथेच खेळता राहू शकतो. म्हणून अल्पावधीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक टाळावी. पण दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा कल मात्र वरील बाजूस कायम आहे. 

- दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी जर आधीच गुंतवणूक केली असेल, तर "होल्ड' करणे हा पर्याय आहे किंवा अंशत- नफावसुली करणे आणि (करेक्‍शन) म्हणजे भाव खाली आला, की परत खरेदी करणे, हा चांगला पर्याय ठरू शकतो. 

- ज्यांना नव्याने या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, त्यांनीसुद्धा भाव खाली आला की आधार पातळीचा विचार करून थोड्या-थोड्या प्रमाणात गुंतवणूक करत राहणे, ही एक चांगली रणनीती आहे; जी जोखीम कमी ठेवण्यास मदत करू शकते. 

- गुंतवणूक करताना किमान तीन वर्षांचा दृष्टिकोन ठेवायला हवा, कारण हा "लंबी रेस का घोडा है,' हे लक्षात ठेवावे. 

(लेखक शेअर बाजाराचे रिसर्च ऍनालिस्ट आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Jamsandekar writes article about reliance industries