संकट गडद: मारुती सुझुकीच्या उत्पादनात 25 टक्के कपात!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने जुलै महिन्यात आपल्या उत्पादनात 25.15 टक्क्यांची कपात केली आहे

मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने जुलै महिन्यात आपल्या उत्पादनात 25.15 टक्क्यांची कपात केली आहे. मारुतीने सलग सहाव्या महिन्यात उत्पादनात कपात केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका मारुतीसह देशातील सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांना बसतो आहे. त्यामुळे उत्पादन आणि मनुष्यबळ कपात या दोन प्रश्नांना ऑटोमोबाईल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते आहे. जुलै महिन्यात मारुतीने 1 लाख 33 हजार 625 वाहनांचे उत्पादन केले आहे.

 गेल्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीने 1 लाख 78 हजार 533 कारचे उत्पादन केले होते. मिनी आणि कॉम्पॅक्ट प्रकारातील अल्टो, वॅगनआर, सेलिरिओ, इग्निस, स्विफ्ट, बॅलेनो, डिझायर या मॉडेलच्या उत्पादनात घट होत 95 हजार 733 वाहनांचे उत्पादन जुलै महिन्यात झाले आहे. तर युटिलिटी प्रकारातील जिप्सी, व्हिटारा ब्रिझा, इर्टिगा आणि एस-क्रॉस या मॉडेलचेही उत्पादन घटून फक्त 19,464 वाहनांचेच उत्पादन जुलैमध्ये झाले आहे. इतरही मिड साईझ, लाईट कमर्शियल व्हेहिकल प्रकारातील वाहनांचे उत्पादन घटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti Suzuki cuts production by 25% in July