कर्मचाऱ्यासोबत संबंध ठेवल्याने ‘मॅकडोनाल्ड्स’च्या सीईओंची हकालपट्टी

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

आपल्याच कंपनीतीलएका कर्मचाऱ्याबरोबर संबंध ठेवल्याप्रकरणी मॅक्डोनाल्ड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली

शिकागो: आपल्याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याबरोबर संबंध ठेवल्याप्रकरणी मॅक्डोनाल्ड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्टीव्ह यांनी 2015 मध्ये ‘मॅकडोनाल्ड्स’ या जगप्रसिद्ध फूड चेन कंपनीच्या 'सीईओ'पदाची सूत्रे हाती घेतली होती. कंपनीतीच्या मेन्यू आणि रेस्टॉरंट्स मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे श्रेय स्टीव्ह यांना जाते. त्यांच्या काळात कंपनीचा शेअर दुपटीने वाढला आहे.

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी सहमतीने देखील संबंध ठेऊ नयेत असा कंपनीचा नियम आहे. मात्र स्टीव्ह गेल्या काही दिवसांपासून आपल्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्याशी डेटिंग करत होते. त्यांनी एका इमेलच्या माध्यमातून कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत असलेल्या संबंधाची माहिती दिली. तसेच “कंपनीच्या धोरणांचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाशी सहमत आहे. आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे” असे म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला.

महत्त्वाचे म्हणजे स्टीव्ह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात देखील मॅक्डोनाल्ड्समधूनच 1993  साली मॅनेजर पदापासून केली होती. त्यानंतर, पिझ्झा एक्सप्रेस आणि वागामामा या आशियाई फूड कंपनीमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2013 मध्ये पुन्हा मॅक्डोनाल्ड्समध्ये परतल्यानंतर 2015 साली त्यांची सीईओ पदावर नेमणूक करण्यात आली होती.

ईस्टरब्रुक यांच्यानंतर क्रिस केंपिजिन्स्की यांना मॅकडोनाल्ड यूएसएचे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: McDonald's CEO Fired Over Consensual Relationshipn With Employee

Tags
टॉपिकस
Topic Tags: