मेट्रोपोलिस हेल्थकेअरचा "आयपीओ' कसा आहे? 

नंदिनी वैद्य
सोमवार, 1 एप्रिल 2019

1.  मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती

2. कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप

1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे? 
- ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे. 

2) कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप कसे आहे? 
- वैद्यकीय निदानासाठी ज्या अनेक प्रकारच्या चाचण्या आवश्‍यक असतात, त्या सर्व चाचण्या ही कंपनी करते. अगदी तुलनात्मक दृष्टीने कंपनीची व्याप्ती बघायची असेल तर मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये 400 चाचण्या होत असतील तर "मेट्रोपोलिस'कडे साधारणतः विविध प्रकारच्या 4000 चाचण्या करण्यासाठीच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. 18 राज्यांमधील 173 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार झाला आहे. थोडक्‍यात म्हणजे भारतातील पहिल्या तीन लॅबोरेटरीजमध्ये कंपनीचा क्रमांक आहे. 

3) "मेट्रोपोलिस'ची आर्थिक कामगिरी कशी आहे? 
- मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचे उत्पन्न 490 कोटींपासून 651 कोटी रुपयांपर्यंत वाढले, तर निव्वळ नफा 81 कोटींवरून 109 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. थोडक्‍यात 18 टक्के "सीएजीआर' दराने मागील तीन वर्षांमध्ये नफा वाढला आहे. कंपनी कर्जमुक्त असून, "कॅश-रिच' म्हणावी अशी आहे. 

4) कंपनीच्या व्यवसायाच्या मजबूत बाबी कोणत्या आहेत? 
- "प्रथम रुग्णाचा विचार आणि मग कंपनी' अशी आजपर्यंतची कंपनीची प्रतिमा आहे. स्वच्छ प्रतिमा राहण्यासाठी आवश्‍यक असणारी मूल्ये कंपनी जपत आहे, असे दिसते. व्यवसाय विस्तार करीत असताना आधीच्या व्यवसायावरील पकड मजबूत ठेवूनच कंपनी पुढे जाताना दिसते आहे. विविध अंगाने कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. त्यात स्वतःच्या शाखा वाढविणे, स्थानिक लॅबोरेटरीज असतील तर त्यांना आपल्याबरोबर घेऊन व्यवसाय करणे, थर्ड पार्टी व्यवसाय करणे यांचा समावेश आहे. तसेच वेळोवेळी गुणवत्तेचा विकास केला जात आहे. घरी जाऊन नमुने गोळा करणे, ऑनलाइन रिपोर्ट पाहण्याची सोय, वेलनेस पॅकेज देणे आदी गोष्टी केल्या जातात. 

5) डायग्नोस्टिक व्यवसायाशी निगडित असणारे धोके काय आहेत? 
- या व्यवसायात आपला ब्रॅंड तळहाताच्या फोडासारखा जपावा लागतो. एकदा नाव खराब झाले तर खूप धोके असतात. चाचण्यांसाठी लागणारे विविध नमुने गोळा करणे हे वेळेशी निगडित असणारे काम आहे. थोडी जरी दिरंगाई झाली तर "रिझल्ट' वेगळे येऊ शकतात. कंपनीचे बरेचसे काम "थर्ड पार्टी'तर्फे चालते. त्यामुळेच त्यांच्याकडून कामात कसूर झाली तर कंपनीचे नाव खराब होऊ शकते. हेल्थकेअर व्यवसायामध्ये खूप सरकारी नियम असतात. त्या सर्वांचे सातत्याने अत्यंत काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक असते. 

6) छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे? 
- डिसेंबर 2018 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांचा प्रतिशेअर निव्वळ नफ्याचा विचार करता, पीई रेशो 37 च्या घरात येतो. त्यानुसार कंपनीकडून देण्यात आलेली "ऑफर' नक्कीच स्वस्त नाही. सेकंडरी मार्केटमध्ये याच व्यवसायात असणाऱ्या डॉ. लाल पॅथलॅबचा सध्याचा पीई रेशो 47 आहे. सध्या सेकंडरी मार्केट तेजीत असताना या शेअरची वरच्या किमतीमध्ये नोंदणी होऊ शकते. परंतु, रिस्क/रिवॉर्ड रेशो हा आता तरी फायदेशीर दिसत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी विचार करावा; अथवा बाजार थोडा पडल्यानंतर जेव्हा "डिस्काउंट सेल' लागतो, तेव्हा असे शेअर घेण्याचा विचार करावा. 

(डिस्क्‍लेमर ः लेखिका "सेबी' नोंदणीकृत रिसर्च ऍनालिस्ट आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील विश्‍लेषण केले आहे. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metropolis Healthcare's Rs 1,200-cr IPO to open for subscription on Apr 3