‘एसआयपी’ची किमया भारी; ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडात 7,900 कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

"गेल्या काही महिन्यांत बाजारात अस्थिरता असूनही म्युच्युअल फंड उद्योगाने चांगली वाढ दर्शविली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढला असून जवळपास 90 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये होत असून उवर्रित डेट फंडात झाली आहे.''

एन. एस. वेंकटेश (मुख्य कार्यकारी अधिकारी, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया)

मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍टोबरमधील गुंतवणूक 42 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे म्युच्युअल फंडांच्या शिखर संस्थेने म्हटले आहे. 

गेल्या दोन महिन्यात बाजारातील अनिश्‍चित वातावरणामुळे गुंतवणूकदार पोळले होते. सप्टेंबर महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स  6.44 टक्‍क्‍यांनी घसरला. ऑक्‍टोबर महिन्यात तो 5 टक्‍क्‍यांनी घसरला. म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये एकूण 35 हजार 529 कोटींचा ओघ दिसून आला आहे.सप्टेंबर महिन्यात मात्र 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामधून काढून घेतली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये गुंतवणूकदारांनी 51,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. वेंकटेश यांनी सांगितले. जवळपास 90 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये होत असून उवर्रित डेट फंडात होत असल्याचे त्यांनी सांगितले. इक्विटी फंडात 15 हजार कोटींची गुंतवणूक झाली. मात्र इन्कम फंडातून 37 हजार 642 कोटींची गुंतवणूक कमी झाल्याचे दिसून आले आहे. "ईएलएसएस" योजनेत गेल्या महिन्यात 1200 कोटींची गुंतवणूक झाली. 

म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वार्षिक आधारावर 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण मालमत्ता आता 22 लाख 23 हजार 560 कोटी रुपयांवर पोचली आहे. जी गेल्यावर्षी याच काळात 21लाख 41 हजार 346 कोटी रुपये होती. शिवाय सेन्सेक्समध्ये देखील  वर्षभरात  3.70 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडातील सहभाग वाढत असून 'रिटेल सेगमेंट' वार्षिक आधारावर 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातील मालमत्ता आता 9 लाख 73 हजार 676 कोटी रुपयांवर पोचली आहे. जी गेल्यावर्षी ऑक्टोबर (2017) महिन्यात 8 लाख 55 हजार 449 कोटी रुपये  होती. 

म्युच्युअल फंडाच्या खात्यांमध्ये देखील 25 टक्क्यांची वाढ होत एकूण खाती (फोलिओ) 790.31 लाख कोटींवर पोचली आहेत. जी गेल्यावर्षी याच काळात 631.65 लाख कोटी होती. चालू आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात सरासरी 11.45 लाख खाती नव्याने जोडली गेली आहेत.

"गेल्या काही महिन्यांत बाजारात अस्थिरता असूनही म्युच्युअल फंड उद्योगाने चांगली वाढ दर्शविली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढला असून जवळपास 90 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये होत असून उवर्रित डेट फंडात झाली आहे.''

एन. एस. वेंकटेश (मुख्य कार्यकारी अधिकारी , असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया)

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नव्या विक्रमाकडे 

ऑक्‍टोबर अखेर आकडेवारी 

एकूण मालमत्ता : 22 लाख 23 हजार 560 कोटी 

एकूण खाती (फॉलिओज): 790.31 लाख कोटी 

किरकोळ खाती : 11 लाख 45 हजार 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MF SIPs up 42 pct at Rs 7900 cr in October