esakal | नोटांमध्ये मायक्रो चीप? अर्थ राज्यमंत्र्यांनी केला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Currency-Notes-Sakal

सरकारच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांमध्ये दररोज सरासरी २ हजार २००हून अधिक बनावट नोटा आढळून आल्या आहेत.

नोटांमध्ये मायक्रो चीप? अर्थ राज्यमंत्र्यांनी केला खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: नोटबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर पाचशे तसेच दोन हजार रुपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या. यासोबत दोनशे, शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्याही नव्या नोटाही चलनात आणण्या आल्या. मात्र, त्यासोबत बनावट नोटाही चलनात मोठ्या प्रमाणावर आल्या. या बनावट नोटांची निर्मिती रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नोटांच्या डिझाईनमध्ये सातत्याने बदल केला जातो आणि सुरक्षेची काळजीही घेतली जाते. मात्र, पाचशे किंवा दोन हजाराच्या चलनी नोटांमध्ये मायक्रो चीप लावण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकून यांनी दिलं.

नोटबंदीनंतर पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा चलनात आणूनही देशातील बनावट नोटांचे प्रमाण कमी झालेले नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांमध्ये दररोज सरासरी २,२०० हून अधिक बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यातही सर्वाधिक म्हणजेच आठ लाखांहून अधिक बनावट नोटा मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात सापडल्या आहेत. अर्थ मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत तब्बल २४ लाखाहून अधिक बनावट नोटा आढळल्या असून यामध्ये रिझर्व बॅंकेला आढळलेल्या बनावट नोटांचे प्रमाण ११ लाखावर आहे. तर गृह खात्याने १३ लाखांहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

महत्त्वाची बातमी- शेअर मार्केट : महाग शेअर बाजार आणि स्वस्त सोने

लोकसभेमध्ये अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, की 2017-18 मध्ये ५ लाख २२ हजार ७८३, 2018-19 मध्ये ३ लाख १७ हजार ३८४ आणि 2019-20 मध्ये २ लाख ६६ हजार ६९५ अशा एकूण ११ लाख ०६ हजार ८६२ बनावट नोटा आढळून आल्या. यासोबतच गृह खात्यानेही विविध कारवायांमध्ये १३ लाख १६ हजार ७४५ बनावट नोटा जप्त केल्या. यामध्ये 2018 मध्ये २ लाख ६१ हजार ८६०, 2019 मध्ये २ लाख १९ हजार ९३८ नोटा आणि 2020 मध्ये ८ लाख ३४ हजार ९४७ बनावट नोटांचा समावेश आहे.

loading image