मोबाईल बँकिंगचे 'हे' अॅप करू नका डाऊनलोड

वृत्तसंस्था
Sunday, 17 February 2019

यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करू नये, असे आरबीआयने सांगितले आहे. 

मुंबई : कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक खातेदार मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, अशा खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करू नये, असे आरबीआयने सांगितले आहे. 

हॅकर्सकडून अनेकदा हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या कोडच्या माध्यमातून संबंधित खातेदाराचा मोबाईल फोन रिमोटवर घेतला जातो. या अॅप कोडला मोबाईलमध्ये टाकल्यानंतर हॅकर्सकडून ग्राहकांना काही परवानग्याही मागितल्या जातात. अशाप्रकारे ग्राहकांच्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातून रक्कम काढली जाते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने सर्व 'कमर्शिअल बँकां'ना दक्षतेचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, यूपीआय किंवा वॉलेटसारख्या पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाईल बँकिंग अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही आरबीआयने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Banking UPI App do not download says RBI