मुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

अंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण

अंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण

 मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात विनंती केली आहे. बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या जगभरात माहितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना मुकेश अंबनींनी पंतप्रधान मोदींना यासंदर्भात पाऊले उचलण्याची विनंती केली आहे. भारतीय नागरिकांची माहिती किंवा डेटा हा भारतीयांच्याच मालकीचा किंवा भारतीयांच्याच नियंत्रणात असला पाहिजे त्यासाठी पाऊले उचलण्याची आवश्यकता अंबानींनी व्यक्त केली आहे. माहितीच्या नव्या वसाहतवादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्याच्या संदर्भात त्यांनी महात्मा गांधींच्या वसाहतवादाविरुद्धच्या स्वातंत्र्य आंदोलनाचाही उल्लेख केला आहे. 'गांधीजींनी ज्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करीत वसाहतवादाला आळा घातला. त्याप्रमाणेच आज माहितीच्या नव्या वसाहतवादाला आळा घालण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.

भारतातील माहितीवर भारतीयांचीच माहिती आणि मालकी असली पाहिजे, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची नाही. माहितीच्या या क्रांतीत जर भारताला यशस्वी व्हायचे असेल तर माहितीवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मिळवलेले वर्चस्व आणि नियंत्रण भारतीयांना परत मिळवावे लागेल. एका अर्थाने भारतीयांची संपत्ती भारतीयांनाच परत केली पाहिजे', असे आक्रमक मत मुकेश अंबानींनी व्यक्त केले आहे. सर्व जग मोदींना कुतीशील व्यक्ती, मॅन ऑफ अॅक्शन म्हणून मान्यता देऊ पाहते आहे. आदरणीय पंतप्रधान आपल्या डिजीटल भारत अभियानात माहितीच्या नियंत्रणासंदर्भातील मुद्दयाचाही समावेश करतील अशी मला खात्री आहे, असेही अंबानी पुढे म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani urges Modi to take steps against data colonisation by global corporations