रिलायन्स बनली जगातील सहावी सर्वांत मोठी "एनर्जी' कंपनी 

वृत्तसंस्था
Thursday, 31 October 2019

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कंपनीने 130.76 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय मूल्यात 9 लाख 32 हजार कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे

मुंबई, ता. 30 : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कंपनीने 130.76 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय मूल्यात 9 लाख 32 हजार कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे. रिलायन्सने ब्रिटिश पेट्रोलियमला (बीपी) बाजारभांडवलाच्या बाबतीत मागे टाकले. बीपीचे बाजार भांडवल 128 अब्ज डॉलर आहे. परिणामी जागतिक पातळीवर ऊर्जा क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सहावी सर्वात मोठी "एनर्जी' कंपनी बनली आहे. 

मंगळवारी लंडन शेअर बाजारात ब्रिटिश पेट्रोलियमचा शेअर 3.8 टक्‍क्‍यांनी घसरून 6.33 डॉलरवर बंद झाला. शेअरधारकांना कंपनीकडून मोठ्या लाभांशाची अपेक्षा होती; मात्र ती पूर्ण न झाल्याने ब्रिटिश पेट्रोलियमच्या शेअरमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून सतत घसरण सुरू आहे. त्याउलट रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 11.60 रुपयांनी वधारून 1478.70 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीचे वातावरण असताना रिलायन्सचा शेअर तब्बल 31 टक्‍क्‍यांनी वधारला आहे. 

शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या भागभांडवलानुसार जागतिक पातळीवरील सर्वाधिक मोठ्या ऊर्जा कंपन्यांचा विचार करता एक्‍सॉन मोबिल कॉर्प (290.42 अब्ज डॉलर), रॉयल डच शेल (238.15 अब्ज डॉलर), शेवरॉन कॉर्प (224.92 अब्ज डॉलर), पेट्रोचायना (149.20 अब्ज डॉलर) आणि टोटल एसए (141.74 अब्ज डॉलर) यांचा क्रम लागतो. सौदी अरेबियाची तेल उत्पादक कंपनी असलेली सौदी अरामको ही जगातील सर्वांत मोठी तेल उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. जी जगातील 10 टक्के तेलाचे उत्पादन करते. चालू वर्षात सर्वाधिक नफा सौदी अरामकोला झाला होता. येत्या महिन्यात कंपनी आयपीओ बाजारात आणण्याची शक्‍यता आहे. सौदी अरामको भारतात आपला व्यवसाय विस्तार करू इच्छित आहे आणि यासाठी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची भागीदार म्हणून निवड केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani's RIL becomes sixth largest global energy firm by market cap