मुकेश अंबानींचे पुत्र 'अनंत' जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालकपदी

मुकेश अंबानींचे पुत्र 'अनंत' जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालकपदी

जिओ प्लॅटफॉर्म्स या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीच्या संचालकपदी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांची नियुक्ती करकण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाच्या साम्राज्यात अखेर अनंत यांचे आगमन झाले आहे. २५ वर्षीय अनंत अंबानी जिओ प्लॅटफॉर्म्सचे अतिरिक्त संचालक म्हणून आपल्या करियरची सुरूवात करणार आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्स मागील काही दिवसांपासून त्यात होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकांमुळे चर्चेत आहे. फेसबुक, जनरल अटलांटिक, केकेआर यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा मागील काही दिवसात केली आहे. 

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये होत असलेली गुंतवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच अनंत अंबानी यांची जिओ प्लॅटफॉर्म्सच्या अतिरिक्त संचालकपदी झालेल्या नियुक्तीने यात आणखीच भर घातली आहे. मात्र प्रत्यक्षात ही नियुक्ती पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊची घोषणा करण्याआधी एक आठवडा झालेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अनंत यांचे ज्येष्ठ बंधू आकाश आणि ज्येष्ठ भगिनी इशा हे दोघेही याआधीच जिओच्या व्यवसायात कृतीशील आहेत. २०१४ मध्येच इशा आणि आकाश यांची रिलायन्स समूहाच्या दूरसंचार आणि रिटेल कंपन्यांच्या संचालकपदी झालेली आहे. दरम्यान अनंत अंबानी हे नेहमी आपली आई निता अंबानी यांच्याबरोबर आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी मुंबई इंडियनच्या संघास प्रोत्साहन देताना दिसत होते. त्याशिवाय अनंत हे रिलायन्सच्या जामनगर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पातील सामाजिक उपक्रमांमध्ये कृतीशील आहेत. मागील दीड वर्षापासून अनंत यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकून त्यांना पुढे आणण्यासाठी तयारी केली जात होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

* २५ वर्षीय अनंत अंबानी जिओ प्लॅटफॉर्म्सचे अतिरिक्त संचालक
* २०१४ मध्येच इशा आणि आकाश यांची रिलायन्स समूहाच्या दूरसंचार आणि रिटेल कंपन्यांच्या संचालकपदी
* धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनंत अंबानी यांचे शिक्षण 
* जिओमध्ये आतापर्यत एकत्रितपणे ७८,५६२ कोटी रुपयांची गुंतवणूक 
* जिओ प्लॅटफॉर्म्सचे इक्विटी बाजारमूल्य ४.९१ लाख कोटी रुपये

पाच महिन्यांआधी अनंत यांनी रिलायन्स समूहाचे दिवंगत संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाषणदेखील केले होते. त्यावेळेस त्यांनी 'रिलायन्स मेरी जान है' असे उद्गार काढले होते. अनेक सामाजिक जबाबदाऱ्यांसाठी अनंत यांची तयारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अलीकडेच अनंत यांचा समावेश श्री बद्रीनाथ केदारनाथ देवस्थान समितीमध्ये झाला आहे. उत्तराखंड सरकारकडून अंबानी कुटुंबियांना त्यांच्या सहभागाबद्दल विचारणा झाली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनंत अंबानी यांचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी ब्राऊन विद्यापीठातून पदवी घेतली आहे. रिलायन्स समूहात भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनंत यांची या वयातील नियुक्ती योग्यच असल्याचे मत संबंधितांकडून व्यक्त करण्यात येते आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स हा रिलायन्स समूहाचा भविष्यातील व्यवसाय आहे. जिओमध्ये आतापर्यत फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा, जनरल अटलांटिक आणि केकेआर यांनी एकत्रितपणे ७८,५६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या जिओ प्लॅटफॉर्म्सचे इक्विटी बाजारमूल्य ४.९१ लाख कोटी रुपये इतके आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com