स्टार्ट अर्ली, रिच सेफली

Mutual Fund Start early reach safely
Mutual Fund Start early reach safely

प्रवासात आपण "स्टार्ट अर्ली , रिच सेफली " हे वाक्य नेहमी वाचतो . अर्थात लवकर प्रवास सुरु करा म्हणजे वेग कमी असला तरी आपण वेळेत आणि  सुरक्षीतपणे योग्य ठिकाणी पोचतो. गुंतवुणकीचे सुद्धा तसेच असते. तरुण वयात लवकर गुंतवणूक सुरु करून आपण गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा ठेवून  संपत्ती उभी करू शकतो. शिवाय तरुण वयात गुंतवणूक करताना थोडी जोखीम घेतली तरी कालांतराने त्या जोखमीचे रूपांतर फायद्यात होते. तसेच गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा असल्यामुळे चक्रवाढ पद्धतीने परताव्याचा फायदा आश्‍चर्यकारक पद्धतीने वाढतो. अर्थात अशी गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी त्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळू शकतो, याचा अंदाज घ्यायला हवा. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिल्यास म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतो, हे सिद्ध झाले आहे.

आजच्या भारतीय तरुणांच्या करियरचा विचार केल्यास साधारणतः 25 वर्षांपर्यंत शिक्षण संपून त्यांच्या नोकरी-व्यवसायाला सुरवात होते. अगदी त्याचवेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करून पुढील 20 वर्षांचे नियोजन केल्यास वयाच्या 45 व्या वर्षी त्याच्याकडे मोठी संपत्ती जमा होऊ शकते.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकरकमी गुंतवणूक आणि दर महिन्यात ठराविक रक्कम गुंतवणे (एसआयपी) या दोन मार्गाने गुंतवणूक करता येते.  खरे तर या दोन गुंतवणूक पर्यायांचे स्वतंत्र फायदे आहेत, त्यामुळे परिस्थिती पाहून योग्य पर्याय निवडावा.

वय वर्षे 25 ते 45 या वीस वर्षांत म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक केल्यास मिळणारे फायदे समजून घेण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे पाहुया.
1) उत्पन्न वाढत जाते, तशी "एसआयपी'ची रक्कम वाढविणे ः मिहीरने वयाच्या 45 व्या वर्षी दरमहा 10 हजार रुपयांची "एसआयपी' इक्विटी फंडात सुरु केली. सलग 20 वर्षे त्याने ती "एसआयपी' सुरु ठेवली. याशिवाय उत्पन्न वाढल्यानंतर वयाच्या 35 व्या वर्षी त्याने 10 हजार रुपयांची अजून एक "एसआयपी' सुरु करून पुढील 10 वर्षे सुरु ठेवली. वयाच्या 45 व्या वर्षी त्याला पहिल्या "एसआयपी'तून दीड कोटी आणि दुसऱ्या "एसआयपी'तून 28 लाख रुपये, असे एकूण एक कोटी 78 लाख रुपये मिळू शकतील.

2) उद्दिष्ट ठरवून दरमहा गुंतवणूक करणे ः सायली आणि तुषार या दाम्पत्याला त्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या 20 व्या वर्षी एक कोटी रुपये "गिफ्ट' द्यायचे होते. म्हणून तिच्या जन्मानंतर लगेच उत्तम वार्षिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या इक्विटी म्युच्यअल फंडात त्यांनी दरमहा साडेसहा हजार रुपयांची "एसआयपी' केली.

3) "एसआयपी' आणि एकरकमी गुंतवणूक करणे ः रमेशने एका चांगल्या इक्विटी फंडात एकरकमी दहा लाख रुपये गुंतविले आणि त्याच फंडात पुढील 20 वर्षांसाठी दरमहा 17 हजार रुपयांची "एसआयपी' सुरु केली. 20 वर्षांनंतर त्याच्या एकरकमी गुंतविलेल्या 10 लाख रुपयांचे सुमारे एक कोटी 63 लाख रुपये होतील आणि 20 वर्षे "एसआयपी' गुंतवणुकीचे त्यावेळचे बाजारमूल्य अंदाजे अडीच कोटी रुपये असेल.
वरील सर्व उदाहरणांमध्ये वार्षिक परतावा 15 टक्के मानला आहे. भारतीय म्युच्युअल फंडांच्या कंपन्यांच्या विविध योजनांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल, की गेल्या 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक परतावा देणाऱ्या अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत.

वय वर्षे 25 ते 45  या वयात माणसाची उत्पन्न कमविण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे या कालावधीत नियमितपणे गुंतवणूक करणे सहजशक्य होते. म्हणूनच तरुणांनी ' स्टार्ट अर्ली , रिच सेफली ' हा मंत्र म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करताना लक्षात ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com