चर्चा 'यूटीआय'च्या 'आयपीओ'ची

ipo
ipo

यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा (यूटीआय एएमसी) बहुचर्चित ‘आयपीओ’ २९ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर २०२० या काळात प्राथमिक बाजारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. भारतात ५५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड व्यवसायाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, त्या यूटीआय म्युच्युअल फंडाच्या आर्थिक मालमत्तेचे व्यवस्थापन करणारी ही कंपनी आहे. ‘क्रिसिल’च्या रिपोर्टनुसार, एसबीआय म्युच्युअल फंडानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. म्युच्युअल फंड, एनपीएस, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ऑफशोअर फंड, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट, रिटायरमेंट फंड याद्वारे आर्थिक मालमत्तेचे व्यवस्थापन ‘यूटीआय एएमसी’ करते.

या इश्‍यूबद्दल सांगायचे झाले, तर यासाठीचा किंमतपट्टा रु. ५५२ ते ५५४ प्रतिशेअर असून, किमान २७ शेअर व त्यापुढे २७ च्या पटीत गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. १२ ऑक्‍टोबर रोजी दुय्यम बाजारात शेअरची नोंदणी होईल. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की या ‘आयपीओ’साठी आपण अर्ज करावा किंवा नाही याचा निर्णय गुंतवणूकदारांना घ्यायचा असेल, तर कंपनीचा आपण ‘स्वॉट’ (SWOT - Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) पद्धतीने अभ्यास केला तर निर्णय घेण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

स्ट्रेंथ्स्‌
जुना आणि नामांकित ब्रॅंड, प्रामुख्याने ‘बी३०’ नगरांमध्ये (प्रमुख मुख्य ३० शहरे सोडून) असलेली लक्षणीय उपस्थिती. त्यामुळे भविष्यात असणारा व्यवसायवाढीचा वाव, पोर्टफोलिओ प्रॉडक्‍टमध्ये  देण्यात येणारी विविधता. EPF, NPS, ESIC अशा ज्या सरकारी योजना आहेत, तिथून कायमस्वरुपी आणि सातत्याने मिळणारा व्यवसाय, ‘कॅश रिच स्टेटस’ या सर्व मजबूत बाबी आहेत.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीकनेसेस
आर्थिक आघाडीवर विचार केला, तर मागील तीन वर्षे कंपनीचे उत्पन्न आणि नफा दोन्हींचा दर घटताना दिसत आहे. परंतु, जूनअखेरच्या तिमाहीमध्ये सुधारणा दिसत आहे. मागील तीन वर्षांत ‘रिटर्न ऑन नेटवर्थ’ १५ टक्‍क्‍यांवरून ९.८८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आर्थिक निकालांवर लक्ष ठेवावे लागेल.

ऑपॉर्च्युनिटीज
बाहेरील विकसनशील देशांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांच्या वर आहे, तर आपल्या देशात ते ५ टकक्‍यांच्या आसपासच आहे. तसेच वाढत चाललेले संगणकीकरण व त्यामुळे गुंतवणूक करण्यात आलेला सुटसुटीतपणा यामुळे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या व्यवसायाला प्रचंड वाव मिळणार आहे.

थ्रेट्‌स
‘सेबी’ने ‘टोटल एक्‍स्पेन्स रेशो’वर (टीईआर) घातलेल्या निर्बंधांमुळे नफ्यावर होणारा परिणाम, अस्थिरतेमध्ये राहणाऱ्या शेअर बाजारावर अवलंबून असलेला इक्विटी म्युच्युअल फंडाचा व्यवसाय, मागील सहा महिन्यांत ‘कोरोना’च्या साथीमुळे गुंतवणूक व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम, नेहमीच तेजी आणि मंदी यामधून जाणारी अर्थव्यवस्था या सर्वांचा थेट परिणाम या व्यवसायावर होत असतो.

आता इश्‍यूच्या बुक व्हॅल्यु व पीई रेशो अथवा या क्षेत्रातील आधीच ‘लिस्टेड’ असलेल्या कंपन्यांच्या दृष्टीने ‘व्हॅल्यूएशन’चा विचार करायचा झाला, तर तो ‘फेअरली प्राइस्ड’ म्हणता येईल, असा आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, निप्पॉन एएमसी आणि एचडीएफसी एएमसी या कंपन्या दुय्यम बाजारात गेल्या दोन वर्षांपासून आहेतच. त्यांचे एकूण ‘प्राईस ट्रॅक रेकॉर्ड’ बघितले, तर निप्पॉन एएमसी (सुरवात रु. २६५, उच्चांक ४४५ आणि आता २५४) आणि एचडीएफसी एएमसी (सुरवात रु. २८४८, उच्चांक ३८४४ आणि आता २२००) असा एकूणच अस्थिर प्रवास दिसतो. त्यामुळे ‘यूटीआय एएमसी’चा विचार करायचा झाला, तर नोंदणीच्या वेळी चांगला भाव मिळेल म्हणून गुंतवणूकदार आपले नशीब आजमावून पाहू शकतात. पण ज्यांना गुंतवणुकीबाबत गंभीरपणे विचार करायचा आहे, त्यांनी ‘आयपीओ’ची एकूण लाट ओसरल्यावर, पुढील दोन-तीन तिमाहींचे निकाल पाहून निर्णय घ्यावा, असे वाटते.

(लेखिका ‘सेबी’नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील मत व्यक्त केले आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com