‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’चा बोलबाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandini Vaidya write lic ipo investment

डिस्क्‍लेमर : लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार या लेखात विचार मांडले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.

‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’चा बोलबाला

भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गेल्या चार मे पासून सुरु झाली आहे आणि आज (नऊ मे) तिचा शेवटचा दिवस आहे. शेअरवाटप १२ मे रोजी होऊन, शेअर बाजारात १७ मे रोजी त्याची नोंदणी होईल. शनिवारपर्यंतच्या अपडेटनुसार, या ‘आयपीओ’ला एकूण १.६६ पट प्रतिसाद मिळाला आहे. आता आजचा एकच दिवस शिल्लक आहे.

‘ग्रे मार्केट प्रीमियम’ अंदाजे रु. ४२ प्रति शेअरच्या घरात आहे. याचा अर्थ शेअर (दुय्यम) बाजारात या शेअरची नोंदणी रु. ४२ ने अधिक होऊ शकते. (‘ग्रे मार्केट’ हे एक अनधिकृत मार्केट असल्यामुळे तेथील भावांचा विचार फक्त सूचक (indicative) म्हणून करावा.)

इश्यूसाठी अर्ज करताना...

छोटे (रिटेल) गुंतवणूकदार, कर्मचारी आणि पॉलिसीधारक या प्रत्येकासाठी या इश्यूमध्ये एक कोटा ठरविण्यात आला आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही एका राखीव कोट्यातून अर्ज करीत असाल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डी-मॅट खात्याद्वारे जास्तीत जास्त रु. दोन लाख गुंतवू शकता. जर तुम्ही कर्मचारी आणि पॉलिसीधारकांच्या कोट्यातील शेअरसाठी अर्ज करीत असाल तर तुम्हाला एकूण चार लाख रुपयांची मर्यादा मिळेल. तथापि, तुम्ही पॉलिसीधारक, कर्मचारी; तसेच छोटे गुंतवणूकदार या तीनही कोट्यांतून अर्ज करीत असल्यास, तुम्हाला एकूण सहा लाख रुपयांची मर्यादा मिळेल. विविध गटासाठी शेअरभावात असलेली सवलत लक्षात घेता, पॉलिसीधारकांना प्रति शेअर रु. ८८९, तर कर्मचारी व छोटे गुंतवणूकदार यांना रु. ९०४ ने अर्ज करावा लागेल.

आयपीओ व्हॅल्युएशन

या इश्यूसाठी रु. ९०२-९४९ हा किंमतपट्टा जाहीर केला गेला आहे. आता या इश्यूसाठी अर्ज करण्याच्यादृष्टीने ही किंमत योग्य आहे किंवा नाही, याचा विचार करावा लागेल. पुढे दिलेल्या कंपनीच्या आकडेवारीचा विचार केल्यावर हे विश्लेषण करणे अधिक सोपे जाईल.

‘इपीएस’, ‘पीइ रेशो’ यांचा विचार केला, तर असे दिसून येते की रु. ४.७ वार्षिक इपीएस धरल्यास, पीइ रेशो २०० च्या घरात येतो. बुक व्हॅल्युच्या तुलनेत सुद्धा किंमतपट्टा अधिक वाटतो. परंतु, इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत फक्त एवढ्याच आर्थिक गुणोत्तरांचा विचार करून चालत नाही, तर अजून एक महत्त्वाचा विचार करावा लागतो, तो म्हणजे प्राइस/एम्बेडेड व्हॅल्यु. एम्बेडेड व्हॅल्यु म्हणजे विमा कंपनीचा आजपर्यंत साठलेला नफा व भविष्यात होणाऱ्या नफ्याची आजची किंमत.

एलआयसीच्या बाबतीत सप्टेंबर २०२१ रोजी एम्बेडेड व्हॅल्यु होती रु. ५,३९,६८६ कोटी. त्या हिशेबाने प्राइस/इव्ही रेशो येतो १.०६-१.१ (रु. ९०२-९४९ या किंमतपट्ट्यासाठी). सध्या बाजारात असलेल्या अन्य विमा कंपन्यांच्या तुलनेत हे गुणोत्तर खूप कमी आहे. त्यामुळे इश्यू किंमत आकर्षक झाली आहे.

‘एफपीओ’ आणावी लागणार

जे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार ‘एलआयसी’च्या बाबतीत करीत असतील, तर त्यांना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आता ही कंपनी फक्त ३.५ टक्के हिस्सा विकत आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार २५ टक्के हिस्सा हा ‘पब्लिक’कडे असणे आवश्यक आहे. त्यानुसार वेळोवेळी कंपनीला ‘फॉलोआॅन पब्लिक आॅफर’ अर्थात ‘एफपीओ’ आणावी लागणार आहे. अशा वेळी बाजारात शेअरचा अधिकाधिक पुरवठा होत राहिला तर शेअरच्या भावावर त्याचा परिणाम होऊ शकतो, ही बाब ध्यानात ठेवावी. पुढील एक वर्षभर तरी अशी ऑफर येण्याची शक्यता नाही.

सर्व साधकबाधक मुद्द्यांचा विचार करता असे दिसून येते, की ‘आयपीओ’ची किंमत आकर्षक असल्यामुळे ‘ऑन टेबल रिटर्न’ म्हणतात, तसे नोंदणीच्या वेळी (लिस्टिंग) शेअरधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु, ‘एलआयसी’चा शेअर हा आपल्या ‘कोअर पोर्टफोलिओ’मध्ये ठेवावा का नाही, हे बघण्यासाठी थोडा वेळ देणे योग्य ठरेल, असे वाटते. त्यामुळे पुढील दोन-तीन तिमाहींचा काळ गेल्यानंतरच दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार करावा लागेल.

Web Title: Nandini Vaidya Write Lic Ipo Investment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top